कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील टाकळी परिसरात शासकीय औद्योगिक वसाहत उभारण्याबरोबरच त्या परिसरातील माजी सैनिकांनी मागणी केलेल्या सर्व मागण्या महामंडळाच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातील, अशी ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.

टाकळी येथील शासकीय औद्योगिक वसाहतीला स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. याप्रश्नावर आंदोलन सुरू करण्यात आले आहे. संदर्भात मंत्रालयात उदय सामंत यांच्या दालनात बैठक पार पडली. बैठकीस तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित होते.

ग्रामीण भागातील युवक उद्योजक झाला पाहिजे. परिसरातील महिलांना गावाशेजारी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उद्योगांचा विस्तार झाला पाहिजे. त्यासाठी शासकीय औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या पाहिजेत, असे नमूद करून सामंत यांनी स माजी सैनिकांच्या मागण्याकडे देखील दुर्लक्ष केले जाणार नाही. त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील, असे बैठकीत सांगितले.

बैठकीत गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित झाला. यावेळी शासकीय गायरान जमिनीवर शेतीचे अतिक्रमण तातडीने काढून घेण्याच्या सूचना सामंत यांनी बैठकीसाठी ऑनलाइन उपस्थित असणाऱ्या कोल्हापूर जिल्हाधिकारी विजय राठोड यांना केली. यावेळी उद्योग, महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सैनिकांचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते.

कोरोना काळा नंतर अनेकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. याच काळात संपुष्टात आलेल्या ग्रीन हाऊसच्या शेतीमुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या गरीब गरजू महिला बेरोजगार झाल्या आहेत. कुटुंबाचे बदलते स्वरूप आणि व्याप्ती वाढल्यामुळे शेतकरी अल्पभूधारक झाला आहे. शेतकऱ्याला आणि त्याच्या मुलाला गावाशेजारी रोजगाराची गरज आहे. शेतकऱ्याचा मुलगा देखील उद्योजक झाला पाहिजे. या सर्व बाबी पाहता राज्य शासनाच्या उद्योग विकास महामंडळाने शिरोळ तालुक्यातील टाकळी परिसरात मंजूर केलेल्या शासकीय औद्योगिक वसाहतीचे काम तातडीने सुरू करावे, अशी आग्रही मागणी टाकळी औद्योगिक वसाहती संदर्भात सामंत यांच्याकडे टाकळीच्या शिष्टमंडळाने केली. शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर प्रमुख उपस्थित होते, यावेळी औद्योगिक वसाहत उभी करण्यासंदर्भात सर्व बाबींची पूर्तता योग्य पद्धतीने सुरू असून शासकीय औद्योगिक वसाहतीच्या कामाला लवकरच गती देऊ अशी ग्वाही नामदार उदय सामंत यांनी शिष्टमंडळांला दिली. यावेळी रणजीतसिंह पाटील, शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती हरिश्चंद्र पाटील, माजी सैनिक विजय पाटील, माजी सैनिक कोंडाजी पवार, माजी सैनिक विलास कदम, माजी सैनिक सुरेश गायकवाड, यांच्यासह उमेशचंद्र पाटील, संभाजी गोते, अशोक गायकवाड, विजय खोत, नितीन इंगळे,अभिजीत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.