सत्तेची दुकानदारी चालविण्यासाठी ताराराणी आघाडीने भाजपची सोबत घेतली आहे. मतासाठी भलामोठा आकडा काढून मतदारांना भुलवण्याचा डाव मांडणाऱ्या या मतलबी आघाडीच्या राजकीय दुकानाला टाळे ठोका, असे आवाहन विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत केले.
मुंडे म्हणाले, कोल्हापूरला ‘स्मार्ट सिटी’तून बाजूला केले; पण अमरावतीत असा कोणता विकास झाला की त्यांचा समावेश भाजप नेत्यांना ‘स्मार्ट सिटी’त करावा लागला? हा कोल्हापूरच्या जनतेचा अपमान नाही तर राजर्षी शाहू महाराजांचा भाजप सरकारने अपमान केला आहे. कोल्हापूरच्या राजाचा अपमान येथील जनता कदापि सहन करणार नाही. महापालिका ताब्यात द्या, अंबाबाईचा विकास करतो, असे मुख्यमंत्री म्हणत आहेत. मग फडणवीस साहेब, गेले वर्षभर तुमचे हात कोणी धरले होते? बहिंारमध्ये कोटय़वधीची बोली लावणाऱ्या भाजप नेत्यांना महाराष्ट्रातील दुष्काळ दिसत नाही. कोल्हापुरात ताकद नसल्याने पालकमंत्र्यांना ‘ताराराणी’च्या हातात हात घालावा लागल्याचे मुंडे यांनी सांगितले. जयंत पाटील, आर. के. पोवार यांची भाषणे झाली. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी खासदार निवेदिता माने, नवीद मुश्रीफ, अनिल साळोखे, जहिदा मुजावर, कादर मलबारी, आदी उपस्थित होते. उपमहापौर जोत्स्ना पवार-मेढे यांनी आभार मानले. मुंडे यांच्या जवाहरनगर चौक, माउली चौक, सदर बझारमध्ये सभा झाल्या. राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ इब्राहिम खाटीक चौकात आयोजित सभेत बोलताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे. या वेळी भाग्यरेखा पाटील, संगीता पोवार, जोत्स्ना पवार-मेढे, बाळकृष्ण पवार-मेढे, ए. वाय. पाटील, निवेदिता माने, आर. के. पोवार, नवीद मुश्रीफ उपस्थित होते.
हिंमत असेल तर चौकशी कराच
अजित पवार, सुनील तटकरे यांच्यानंतर आता जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून हसन मुश्रीफ यांच्या मागे भाजप सरकार लागले आहे. हिंमत असेल तर सगळी चौकशी पूर्ण करून निष्कर्षांपर्यंत याच. सत्तेत येऊन वर्ष झाले तरी योग्य आणि अयोग्य हे जर तुम्हाला समजत नसेल, तर तुमच्याबद्दल न बोललेलेच बरे, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी टीका केली.
दादांकडे तारतम्य नाही
जिल्हा बॅँकेची वसुलीची कारवाई निवडणूक काळातच जाहीर करून हसन मुश्रीफ व राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे षडय़ंत्र पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. अधिकार कसे वापरायचे याचे तारतम्य त्यांना नाही. जनता सरकारच्या काळात असेच झाले आणि त्यानंतर सारा देश इंदिरा गांधींच्या बाजूने उभा राहिला, याचे भान त्यांनी ठेवावे, असे जयंत पाटील म्हणाले.