|| दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आखाडा रंगत चालला आहे. काँग्रेस पक्षाकडे हा मतदारसंघ असल्याने  दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. याच वेळी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने दंड थोपटले आहेत. भाजपने बिनविरोध निवडणूक करण्याचा प्रस्ताव फेटाळत जयश्री जाधव यांनाच उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली असतानाच पक्षातील अर्धा डझन इच्छुकांनी कंबर कसली आहे. आप सह अन्य उमेदवार निवडणुकीत उतरणार असल्याने ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता फारच कमी आहे.

 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात गेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवार उद्योगपती चंद्रकांत जाधव विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला होता. दोन वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी प्रामुख्याने उद्योजकांच्या प्रश्नांचा पाठपुरावा केला होता. गेल्या महिन्यात त्यांचे अकाली निधन झाले. निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची प्राथमिक तयारी सुरू केली आहे.

 बिनविरोधचा प्रस्ताव

आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी जिल्हा काँग्रेस समितीमध्ये जिल्हाध्यक्ष, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा आयोजित केली होती. सभेची सांगता करताना राष्ट्रवादीचे नेते, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी आणि  चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री यांना विधानसभेत पाठवावे, असे आवाहन आणि अपेक्षा व्यक्त केली होती. पुढे यावर फारशी चर्चा झाली नाही. महिन्याभारच्या घटना – घडामोडीनंतर हा विषय मावळतीच्या दिशेने झुकत चालला आहे.

 शिवसेनेचीही तयारी

 मधल्या काळात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे धुमशान सुरू झाले. महाविकास आघाडीच्या माध्यमातून बँकेची निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव बारगळला. शिवसेनेने स्वबळ आजमावताना निवडणुकीत तीन महत्त्वाच्या जागांवर विजय संपादन केला. तेव्हापासून शिवसेनेच्या बाहूचे बळ वाढले आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप अशा सर्वांना आव्हान देण्याची सेनेची तयारी दिसू लागली आहे.  महाविकास आघाडीत मुश्रीफ -पाटील या दोन प्रमुख मंत्र्यांनी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली असताना शिवसेनेने निवडणूक लढविण्याचा इरादा व्यक्त केला आहे. याकरिता मातोश्रीवर पर्यायाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घातले जाणार असल्याचे सोमवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात खासदार संजय मंडलिक यांनी स्पष्ट केले आहे. क्षीरसागर यांना पुन्हा रिंगणात उतरवण्याची तयारी दिसून आली.

विशेष म्हणजे वर्षानुवर्षे एकमेकांशी  फटकून वागणारे शिवसेनेतील आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी प्रथमच एका मंचावर दिसून आले. मातोश्रीवरून मिळणाऱ्या प्रतिसादावरून शिवसेनेची उमेदवारी निश्चित होणार की महाविकास आघाडीच्या सूत्रानुसार ते काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी राहणार याचा फैसला होणार आहे. हा निर्णय निवडणुकीच्या दृष्टीने निर्णायक ठरू शकतो.

भाजपाचे आव्हान

निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी जवळपास फेटाळून लावला आहे. त्यांनी जाधव कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांनाच भाजपकडून निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव दिला आहे. चंद्रकांत जाधव व त्यांचे कुटुंबीय हे पूर्वीपासून रा. स्व. संघ, भाजपशी संबंधित राहिले. जयश्री जाधव या भाजपच्या नगरसेविका होत्या. पक्षीय संबंध लक्षात घेऊन जयश्री जाधव यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी, असा आमदार पाटील यांचा मनोदय आहे. अन्यथा भाजपच्या सुकाणू समितीच्या निर्णयानुसार उमेदवार निश्चित केला जाईल, असे त्यांनी घोषित केले आहे. तथापि जाधव कुटुंबीयांची या प्रस्तावाला होकार देण्याची तूर्तास मानसिक तयारी दिसत नाही. याचवेळी महेश जाधव, सत्यजित कदम या मागील विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांसह काही दुसऱ्या फळीतील भाजपच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी दर्शवली आहे. पोटनिवडणुकीबाबत नेमके काय होणार याचा निर्णय गुरुवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर स्पष्ट होईल, असा रागरंग असला तरी निवडणूक रंगतदार होणार असल्याचे वातावरण आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Testing political elections in kolhapur bjp shivsena congress ncp akp
First published on: 20-01-2022 at 00:00 IST