scorecardresearch

दहशतवादाच्या छायेत वस्त्रोद्योजकांचा इटली अभ्यास दौरा

जगाला हादरा बसला असताना इटली येथे ‘इटमा’ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील वस्त्रोद्योजकांनी आपला इटली अभ्यास दौरा कायम ठेवला.

फ्रान्सवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने जगाला हादरा बसला असताना इटली येथे सुरु असलेल्या ‘इटमा’ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील वस्त्रोद्योजकांनी आपला इटली अभ्यास दौरा कायम ठेवला. फ्रान्सच्या लगतच असलेल्या इटलीमध्ये दहशतवादी हल्ल्याची कसलीही विचलित होणारी प्रतिक्रिया उमटली नाही. उलट दैनंदिन वातावरण कायम राहिल्याने उद्योजकांना इटमा सह इटली दर्शन करणेही सुलभ झाले आहे. या दौऱ्यामध्ये वस्त्रनगरी इचलकरंजीतील सुमारे तीनशे उद्योजक सहभागी झाले असून राज्यातील हा आकडा पाचशे उद्योजकांपर्यंत आहे.
वस्त्रोद्योगातील तांत्रिक बदलाचा वेग कमालीचा आहे. विशिष्ट प्रकारच्या मशिनरींमध्ये सातत्याने संशोधन व विकास होत असतो. परिणामी गतवर्षी सादर झालेल्या मशिनरीत पुढच्या वर्षी आणखी नवा टप्पा गाठलेला असतो. यामुळे वस्त्रोद्योगाच्या जागतिक बाजारात टिकून राहायचे तर विकासाची ही गती कवेत घेणे उद्योजकांना गरजेचे असते. हे लक्षात घेऊनच दर चार वर्षांनी इटमा (इंटरनॅशनल टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चिरग एक्झिबिशन) नावाचे जागतिक दर्जाचे प्रदर्शन आयोजित केले जाते. गतवर्षी मुंबईत पार पडलेले प्रदर्शन यंदा इटलीमध्ये आयोजित केले. या प्रदर्शनामध्ये जगाच्या कानाकोपऱ्यातील वस्त्रोद्योजक सहभागी होत असतात. तसेच जगातील नामांकित कंपन्या आपल्या अद्ययावत मशिनरी, सुटे भाग, संशोधनाची माहिती सादर करीत असतात. जगातील वस्त्रोद्योगातील मशिनरी उत्पादक उद्योजक, वस्त्र उद्योजक, संशोधक यांच्यासाठी इटमा म्हणजे कुंभमेळाच असतो.
भारतातील पारंपरिक वस्त्रोद्योगात बदल व्हावा यासाठी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात टफस् (टेक्निकल अपग्रेडेशन फंड) ही योजना सुरु करण्यात आल्याने तेव्हापासून भारतातील तांत्रिक बदलाचा वेग कमालीचा वाढला. अगदी विकेंद्रित क्षेत्रातील वस्त्रोद्योजक ही नव्या बदलांचा स्वीकार करू लागला. राज्याचे मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीत आधुनिक शटललेस लुमचा मोठय़ा प्रमाणात विकास झाल्याने येथील वस्त्रोद्योगाचे चित्र झपाटय़ाने बदलले. मात्र इतक्यावर विसंबून न राहता वस्त्रनगरीतील वस्त्र उद्योजकांना नवे ते हवे या बदलाने मोहित केले. त्यामुळे जगात कोठेही इटमाचे प्रदर्शन असले की तेथे राज्यातील सर्वाधिक वस्त्रोद्योजक इचलकरंजीचेच असतात.
यंदाचेही चित्र कायम राहिले. तथापि, या वर्षी घडलेली थरारक घटना म्हणजे फ्रान्सवर झालेला आयसीस या दहशतवादी संघटनेचा हल्ला होय. या हल्ल्याने युरोपसह जगही हादरून गेले. या घटनेमुळे इटलीला गेलेल्या वस्त्रोद्योजकांना नेमक्या कोणत्या स्थितीला सामोरे जावे लागणार, याचे काहूर उठले. तथापि इटमा सुरू झाल्यापासूनचा आजवरचा अनुभव पाहता तेथे गेलेल्या कोणालाही फ्रान्सवरील हल्ल्यामुळे अजिबात विचलित व्हावे लागले नाही. याबाबत माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले, की इटमा प्रदर्शनातील कोणाही उद्योजकाला विनाव्यत्यय प्रदर्शन पाहता आले. तेथील दैनंदिनी व्यवहार इतके सुरळीत होते, की अनेकांनी इटली दर्शन करून नंतर आता युरोप दर्शन सुरू केले आहे. या हल्ल्याचे आपल्याकडे जितके अवडंबर माजवले गेले त्याचा मागमूसही तेथे पाहायला मिळाला नाही. उलट वस्त्रोद्योगातील नवतांत्रिकतेचा आविष्कार सर्वाना आनंद देणारा होता.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Textile entrepreneur italy tour