दयानंद लिपारे, लोकसता 

कोल्हापूर : दिवाळी पाडव्याची वस्रोद्योगातील उलाढाल अत्यल्प प्रमाणात झाली आहे. सूत दरात झालेली लक्षणीय वाढ आणि कापडाच्या मागणीतील घट याचा हा परिणाम आहे. जागतिक पातळीवरील उलाढालीचाही त्यावर प्रभाव दिसत आहे. सुरुवात निराशाजनक झाली असली तरी दिवाळीपासून सुरू होणाऱ्या व्यापारी आर्थिक वर्षांत उलाढाल गतिमान होईल असा विश्वास एका वर्गाकडून व्यक्त केला जात आहे.

वस्त्रोद्योगामध्ये दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर सौदे केले जातात. १ एप्रिल ते ३१ मार्च असे आर्थिक वर्ष असले तरी वस्त्रोद्योगात  व्यापारी चोपडा पूजन करून दीपावली पाडव्यापासून आर्थिक हिशोब स्वतंत्र ठेवत असतात. या दिवशी होणाऱ्या सौद्याला विशेष महत्त्व असते. दिवाळी पाडव्याचे सौदे, उलाढाल पुढील संपूर्ण वर्षभरावर परिणाम करणारी असल्याची भावना वस्त्र उद्योजक, व्यापाऱ्यांमध्ये आहे. मात्र यंदा पाडव्याच्या उलाढालीत निरुत्साही वातावरण दिसून आले.

दरवाढीचा फटका

गेल्या काही दिवसांपासून सुताचे दर सातत्याने वाढत चालले आहे. अनैसर्गिक होणाऱ्या दरवाढीला लगाम घातला जावा अशा तक्रारी थेट केंद्रीय वस्त्र मंत्रालयापर्यंत केल्या आहेत. तरीही सूत व्यापाऱ्यांनी दरवाढ सुरूच ठेवली आहे. दिवाळीच्या तोंडावर यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. प्रति किलो सुमारे १० ते २० रुपये दरवाढ झाल्याने यंत्रमागधारकाला फटका बसला आहे. यंत्रमागधारकांनी सूत दराबाबत कमालीची अनिश्चितता आहे. सुत दरवाढ किती प्रमाणात उंचावणार याची खात्री नसल्याने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी करण्याचे टाळले आहे. अगदी जेमतेम स्वरूपातच मुहूर्ताची खरेदी झाली आहे. असा निराशाजनक अनुभव यापूर्वी नसल्याचे व्यापारी सांगतात. हा वस्त्रोद्योगाला धक्का असल्याचे मानले जात आहे. विशेषत: ४० काऊंट (नंबर)च्या पुढे असणाऱ्या सुतात वाढ झाली आहे; तर ८० काऊंटपेक्षा अधिक अशा उत्तम दर्जाच्या सुतामध्ये तर अधिकच वाढ झाली आहे.

कापूस दरवाढीचा परिणाम

यंदाच्या हंगामात ‘पांढऱ्या सोन्या’चे दर  वधारले आहेत. कापूस दरात प्रति खंडी दहा ते पंधरा हजार रुपये वाढ झाली आहे. सुमारे सहा हजार दोनशे रुपये हमीभाव असताना आठ हजाराहून अधिक रुपयेहून अधिक दराने कापूस खरेदी केला जात आहे. कापसाच्या दरवाढीचा परिणाम सूत दर वाढण्यात होत असल्याचे सांगितले जात आहे. बडे कापूस उत्पादक देश असलेल्या अमेरिका, चीन या देशात पावसामुळे कापूस पीक अतोनात खराब झाले आहे. परिणामी भारतातील कापूस आणि सुताचीही मागणी वाढली आहे. कापूस दरवाढीचा परिणाम सूत दरवाढीवर झाला आहे. कोविड काळामध्ये यंत्रमाग बंद असल्याने सुताची मागणी घटली होती. गेल्या चार-पाच महिन्यांमध्ये यंत्रमाग व्यवसायाला गती मिळाली आहे. सुताची मागणी वाढल्याने त्याचा सूत दर वाढीवर परिणाम झाला आहे.

कापडाची वीण उसवली कापूस, सूत दरामध्ये वाढ झाली असताना कापडाला अपेक्षित दर मिळत नाही, असे व्यापारी वर्गाची प्रतिक्रिया आहे. ‘उत्पादन खर्चाच्या तुलनेत कापडाला कमी किंमत मिळत आहे. शिवाय पूर्वीच्या तुलनेत मागणी घटली आहे. यावर्षी दीपावली पाडव्याचे सौदे केवळ १० ते १५ टक्के इतक्या अल्प  प्रमाणात झाले आहेत. सर्वसामान्य ग्राहकांनी अन्नधान्याला प्राधान्यक्रम दिला आहे. त्यानंतर कापड, कपडय़ांसह अन्य वस्तूंची खरेदी केली जात आहे. शिवाय कापड विक्री केल्यानंतर बिले मिळण्यास विलंब लागत आहे. या सर्वांमुळे यंदा दीपावली पाडव्याच्या उलाढालीवर परिणाम झाला आहे,’ असे इचलकरंजी पॉवरलूम अँड यार्न मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष उगमचंद गांधी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. व्यापारी वर्षांची सुरुवात निराशाजनक झाली असली तरी हे वर्ष भांडवल उपलब्धता चांगली असणाऱ्या घटकांना तेजीत जाणार आहे, असाही आशावाद व्यक्त केला जात आहे. आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर आर्थिक वर्षांची नांदी झाली असून नूतन वर्ष नेमके कसे जाणार याविषयी वस्त्रोद्योगजगतात कुतूहल, भीती, आशावाद, संभ्रम अशा संमिश्र भावना दाटल्या आहेत.