राज्यातील सहकारी क्षेत्रातील सूतगिरण्या दीपावली सणापासून एक महिना बंद ठेवण्याचा निर्णय इचलकरंजी येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या बठकीत घेण्यात आला. शिरोळ तालुका मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या कार्यस्थळी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी होते.

राज्यातील वाढलेले वीजदर, कापसाचे भडकलेले भाव आणि सुताच्या उतरलेल्या दरांमुळे सूतगिरण्यांना कोटय़वधी रुपयांचा होत असलेला तोटा अशा पाश्र्वभूमीवर कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर या जिल्ह्णातील सहकारी सूतगिरण्यांच्या अध्यक्ष व कार्यकारी संचालकांची बठक झाली. या बठकीमध्ये राज्यातील सहकारी सूतगिरण्यांच्या आíथक स्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच महाराष्ट्र शासनाने तीन रुपये प्रतियुनिट दराने वीजदराची सवलत आणि प्रति चात्यामागे तीन हजार रुपये कर्ज असे आश्वासन दिले होते. मात्र त्याला विलंब झाल्यामुळे दिवसेंदिवस नुकसानीत जाणाऱ्या सूतगिरण्या चालवणे अत्यंत अडचणीचे झाले आहे. त्यामुळे  बठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.

यंत्रमाग बंद पडण्याची भीती महासंघाच्या या निर्णयामुळे सद्य:स्थितीत चालू किंवा अंशत: चालू असलेल्या ६३ सूतगिरण्यांचे उत्पादन पूर्णत: बंद राहणार आहे. ज्यामुळे ५० हजार कामगार बेकार होणार आहेत. तसेच बाजारामध्ये सुताची टंचाई निर्माण होणार असल्याने यंत्रमाग बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे.