कोल्हापूर : येथून जवळच असलेल्या बालिंगा गावातील कात्यायनी ज्वेलर्स मध्ये गोळीबार करत धाडसी दरोडा घालणाऱ्या संशयितांपैकी दोघांना शनिवारी पोलिसांनी जेरबंद केले. अवघ्या ३६ तासात मुख्य सूत्रधार विशाल धनाजी वरेकर, कोल्हापुरातील सराफ सतीश पोहाळकर यांना ताब्यात घेतले आहे. अन्य ५ संशयितांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके रवाना करण्यात आली.
संशयित पोहाळकर, वरेकर यांनी अन्य दोन साथीदारांच्या मदतीने गुरुवारी कात्यायनी ज्वेलर्समध्ये भर दिवसा गोळीबार करत दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे दोन कोटी रुपये मुद्देमाल लंपास केला होता. दुकान मालक रमेश माळी आणि त्यांचे मेहुणे जितू माळी यांना गोळीबार, बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले होते. रस्त्यावर देखील हवेत गोळीबार करत दहशत माजवली होती.
३० लाखाचा मुद्देमाल जप्त
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अभिलेख्यावरील आरोपी यांचा तपास सुरू केला. अवघ्या दीड दिवसात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या पथकाने सात संशयतांपैकी मुख्य सूत्रधारासह दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली चार चाकी मोपेड आणि ३६७ ग्रॅम वजनाचे दागिने असा २९ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरोड्याचा मुख्य सूत्रधार वरेकर आणि पोहळकर यांची तुरुंगातच ओळख झाली होती. त्यातूनच कात्यायनी ज्वेलर्सवर दरोडा घालण्याचा कट ठरला असता तो कृतीत आणताना त्यांना परप्रांतीय पाच चोरट्यांचीही साथ मिळाली.