कोल्हापूर : ईडी प्रकरणी चौकशी सुरू असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांना उच्च न्यायालयाने सुनावणी वेळी दिलासा दिला. तर त्यांच्याविरुद्ध तक्रार करणारे किरीट सोमय्या यांच्या न्यायालयीन चौकशीचे निर्देश दिले. या निर्णयाचे कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.
किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले. त्यानंतर मुश्रीफ यांचे घर तसेच ते अध्यक्ष असलेले कोल्हापूर जिल्हा बँक, त्यांचा सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना, ब्रिस्क साखर कारखाना याची चौकशी सुरू झाली. यावर मुश्रीफ यांनी अटकपूर्व जामीनसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
‘ कराल काय नाद परत ‘
याची आज सुनावणी होत असताना न्यायालयाने सोमय्या यांची न्यायालयीन चौकशी करण्याचे निर्देश दिले. या निर्णयाचे कोल्हापुरात स्वागत करण्यात आले. न्यायालयाच्या निकाल जाहीर होताच वृत्तपत्रांच्या ऑनलाईन तसेच वाहिनांच्या बातम्या यांच्या लिंक कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या समाज माध्यमात अग्रेषित केल्या. त्याचे छायाचित्रे डीपी म्हणून वापरली. काहींनी किरीट सोमय्या यांना उद्देशून ‘ कराल काय नाद परत ‘ अशी विचारणा सुरू केली. अनेक प्रकारच्या मिम्स दिसत होत्या.
गुरु शिष्य संदर्भ
आज दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांची जयंती होती. त्याचा संदर्भ घेऊन ‘ उच्च न्यायालयाचा निर्णय हा योगायोग म्हणायचा की त्याला मंडलिक यांनी शिष्याला दिलेला आशीर्वाद म्हणायचा. या गुरु शिष्याच्या जोडीला कायम स्वरूपी महाराष्ट्र आठवणीत ठेवेल. सदा हसन प्रेमी ‘ असे संदेशही अग्रेषित झाले गेले अनेक दिवस चिंतेत असलेल्या मुश्रीफ समर्थकांना या निर्णयामुळे हायसे वाटले.