कोल्हापूर : आगामी संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन कोल्हापूर महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज केल्याचा दावा केला होता. जूनच्या पहिल्याच आठवडय़ात एकाच दिवशी झालेल्या मुसळधार पावसाने महापुराच्या नियोजनाचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे. याविरोधात आवाज उठवल्यानंतर नागरी कृती समिती व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली असता नालेसफाई, स्वच्छता ही कामे अपुरी असल्याचे निदर्शनास आले आहे. अजूनही झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडून असल्याने या विरोधात राजकीय पक्षांना आंदोलन करावे लागत आहे. यामुळे महापूर आलाच तर करवीरवासीयांना कोणत्या संकटाला तोंड द्यावे लागेल याची भययुक्त चर्चा होत आहे. कोल्हापूर शहराला गेल्या दोन दशकांत चार वेळा जबर महापुराचा तडाखा बसला आहे. गतवर्षी महापुरामुळे पंचगंगा नदीने विक्रमी पाणी पातळी गाठली होती. शहराच्या बऱ्याचशा भागात महापुराचा महापुराचे पाणी घुसले होते. या आपत्तीमुळे मोठी वित्तहानी झाली होती.

महापुराचा गतानुभव लक्षात घेऊन कोल्हापूर महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज करण्यासाठी एप्रिल महिन्यापासूनच यासंदर्भातील कामांना हात घातला होता. नालेसफाईचे काम पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला. साडेपाच लाख लोकसंख्येचा विचार करून आरोग्य विभाग, अग्निशमन दल, सार्वजनिक बांधकाम, विद्युत विभाग येथील यंत्रणा सज्ज करण्यात आली. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होण्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन केले, तर अन्य तीन दक्षता पथक स्थापन करण्यात आली. वृक्षांची पडझड होताच रस्ता मोकळा करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली. प्रत्येक विभागीय कार्यालयात अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली. महापालिका प्रशासन पूरस्थितीला सज्ज असल्याचा दावा आयुक्त तथा प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी केला होता.

पावसाने हाहाकार

जून उजाडताच कोल्हापुरात पावसाने जोर धरला. २ जून रोजी सायंकाळी हजेरी लावलेल्या ढगफुटीसारख्या पावसाने शहरातील वर्दळीच्या भाग असलेल्या ठिकाणी पाणी साचल्याने नागरिक, वाहनधारकांची तारांबळ उडाली. शंभराहून अधिक ठिकाणी वृक्ष कोसळणे, फांद्या तुटणे असे प्रकार घडले. त्यात वाहनांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. विजेचे खांब वाकल्याने विद्युतपुरवठा खंडित झाला. पहिल्याच पावसाने शहराच्या महापूर नियोजनाचा बोजवारा उडाला. नालेसफाईचे काम ८५ टक्के झाले आहे. उर्वरित काम आठवडाभरात पूर्ण होईल असे आयुक्तांनी सांगितले होते. त्यावर पुन्हा कोल्हापूर तुंबणार नाही याबाबत नागरिकांना आश्वासित करणार का, या प्रश्नावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मौन पाळले आहे. यामुळे महापालिकेचे आपत्ती नियोजन कितपत सक्षम आहे या विषयी संशय निर्माण झाला आहे.

पाहणीत दोषांची मालिका

कोल्हापुरातली पहिल्याच पावसाने कोल्हापूरची बिकट अवस्था केली. त्यावर सामाजिक कार्यकर्ते, नागरी कृती समिती आक्रमक झाली. समितीने आयुक्त, अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यातून नालेसफाईसह पूरस्थितीच्या कामांची संयुक्त पाहणी करण्याचा निर्णय घेतला. या आठवडय़ामध्ये झालेल्या पाहणीमध्ये नालेसफाईचा दावा बिनबुडाचा असल्याचे स्पष्ट झाले. प्रमुख २४ नाल्यांमध्ये कचरा साचून राहाणे, सफाई व्यवस्थित न करणे यासारखे दोष आढळले आहेत. नाल्यावर सिमेंटचे पत्रे टाकून खोकी ( छोटी दुकाने) उभारण्यात आली असल्याने ना धड जेसीबी मशीनद्वारे स्वच्छता करता येते ना मनुष्यबळाचा करावी, अशी दुर्धर अवस्था आहे. ‘हे सारे चित्र बदलण्यासाठी महापालिकेने युद्धपातळीवर प्रयत्न करायचे म्हटले तरी ते शक्य होणार नाही. कोल्हापूर महापालिका प्रशासनाचा बेफिकीरी कारभार यास कारणीभूत आहे,’ असे कृती समितीचे सदस्य, अ‍ॅडवोकेट बाबा इंदुलकर यांनी सांगितले. पाऊस उलटून पंधरा दिवस झाले तरी शहरातील झाडांच्या फांद्याचा रस्त्यावर ढीग लागलेला आहे. महापालिकेने पडलेल्या झाडांचे छायाचित्र पाठवून दिल्यास निर्गत केली जाईल, असे सांगितले होते. याकडे दुर्लक्ष झाल्याने गुरुवारी आम आदमी संघटनेने महापालिका प्रशासनाला फांदी भेट आंदोलन देऊन नियोजनाचा वेगळय़ा पद्धतीने निषेध नोंदवला आहे.