बीड जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कामात तलावात बुडून मृत्यू पावलेला कोल्हापुरातील आपदा मित्राच्या मदतीसाठी माजलगाव येथील ग्रामस्थांनी एका दिवसात वीस लाख रुपयांचा निधी संकलित केला आहे. आणखी पाच लाख रुपये संकलित करून ही रक्कम राजशेखर मोरे याच्या कुटुंबियांकडे सुपूर्द केली जाणार आहे.

बुडालेल्या डॉक्टरचा शोध घेण्यासाठी गेलेले कोल्हापुरातील दोन आपदामित्र पाण्यात बुडाले होते. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे धरणात शोध घेत असताना राजशेखर प्रकाश मोरे ( वय ३२ ) हा आपदा मित्र बुडाला तर शुभम काटकर (वय २५ ) हा जखमी झाला होता.

दातृत्वाचा आदर्श
बचाव कार्य करणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन पथकातील आपदामित्र राजशेखर याचा मृत्यू झाल्याची सल माजलगावकरांना लागली होती. त्याची उतराई म्हणून आज माजलगाव येथे मदत फेरी काढण्यात आली. त्याला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवसभरात सुमारे वीस लाख रुपये संकलित करून माजलगाव तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्यातील सात लाख रुपये ऑनलाईन दारे राजशेखर यांच्या कुटुंबीयांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे. उर्वरित रक्कम तसेच आणखी रक्कम गोळा करून एकूण २५ लाख रुपये कुटुंबियांना देण्याचे निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.