वीज कनेक्शन तोडल्याच्या नैराश्येतून तरुणाची आत्महत्या

गत दीड वर्षापासून करोनाच्या महामारीमुळे व्यवसाय बंद असल्याने हट्टीकट्टी कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले होते

The young man committed suicide due to power cut

कोल्हापूर : आर्थिक टंचाईमुळे वीज बिल भरण्यास सवलत मिळावी अशी विनवणी करुनही महावितरणच्या कर्मचार्‍यांनी घरातील वीज कनेक्शन तोडल्याने नैराश्यातून इचलकरंजी येथे २७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. विशाल बाबु हट्टीकट्टी, असे त्या तरुणाचे नांव आहे.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, येथील गणेशनगर परिसरात विशाल हट्टीकट्टी हा पत्नी व चार वर्षाची मुलगी व दोन वर्षाचा मुलगा यांच्यासोबत राहण्यास आहे. तो यंत्रमाग कामगार असून गत दीड वर्षापासून करोनाच्या महामारीमुळे यंत्रमाग व्यवसाय बंदच असल्याने हट्टीकट्टी कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाल्याने गत काही महिन्यांपासून त्यांना घरगुती वीज बिल भरता न आल्याने जवळपास ८२०० रुपये बिल थकीत होते.

या थकबाकी पोटी शुक्रवारी सकाळी महावितरण कंपनीचे कर्मचारी हट्टीकट्टी याच्या घरी आले होते. त्यावेळी हट्टीकट्टी याने आपल्या परिस्थितीची जाणीव करुन देत काम बंद असल्यामुळे बिल थकले आहे. महिन्याभरात ते भरतो. घरी लहान मुले असल्यामुळे वीज कनेक्शन तोडू नका अशी विनवणी केली. परंतु कर्मचार्‍यांनी त्याचे काहीही न ऐकता वीज कनेक्शन तोडले व निघून गेले. त्यामुळे निराश झालेल्या विशाल याने घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही कामानिमित्त बाहेर गेलेली त्याची पत्नी घरी परतली असता हा प्रकार उघडकीस आला. विशाल याने आत्महत्या केल्याने नागरिकांनी त्याच्या मृत्यूस महावितरणच जबाबदार असल्याचे सांगत तीव्र संताप व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस दाखल झाले.

महावितरण विरोधात तीव्र संताप

दरम्यान, विशाल याच्या मृत्यूस महावितरणचा मनमानी कारभारच जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत नगरसेवक राजू खोत यांच्यासह नागरिकांनी केली आहे. मृत्यूस कारणीभूत महावितरण कंपनीने हट्टीकट्टी कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी, त्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: The young man committed suicide due to power cut srk

ताज्या बातम्या