कोल्हापूर : कोल्हापूर शहराचा विषय दंगलीपुरता संपला आहे, अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी रात्री एका व्यापक बैठकीनंतर दिली. या बैठकीमध्ये यापुढे दंगल होणार नाही, असे वचन सर्व पक्षांच्या प्रमुखांनी मला दिले आहे, असा उल्लेख करून ज्याचा शेवट गोड ते सारे गोड, अशा शब्दात त्यांनी बैठकीची फलनिष्पत्ती व्यक्त केली.
कोल्हापूर शहरातील दिवसभराच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री केसरकर हे तातडीने सायंकाळी कोल्हापुरात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, पोलीस महासंचालक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांशी चर्चा केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केसरकर म्हणाले, यापुढे शिवशाहूंच्या कोल्हापूरच्या भूमीत आजच्यासारखा प्रकार होणार नाही, याची ग्वाही मला सर्वपक्षीय प्रमुखांनी दिली आहे. त्यांच्या विचाराने जाण्याची शपथ या सर्वांनी घेतली असून, ही बाब महाराष्ट्राला दिशा देणारी आहे.




हेही वाचा – कोल्हापूर जातीय तणावामागे राजकारणाची किनार?
आंदोलन स्थळ हे व्यापारी पेठेचे असताना तेथे मोठ्या प्रमाणात दगड धोंडे येण्यामागे षडयंत्र आहे का, असा प्रश्न विचारला असता मंत्री केसरकर म्हणाले, दंगलखोर हे कोणाशी संबंधित नसतात. या प्रकाराचे वास्तव दंगलीच्या चौकशीतून समोर येईल. माजी पालकमंत्री सतेज पाटील यांना बैठकीसाठी निमंत्रित केले होते. माझे त्यांच्याशी मैत्रीचे संबंध आहेत. त्यांच्याकडे काही माहिती असेल तर त्यांनी मला द्यावी, असे केसरकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरावेळी सांगितले.