Mumbai Maharashtra Civic Body Election 2026 : राज्यातील २९ महानगपालिकांच्या मतदानाला सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रांवर रांगा पाहायला मिळत आहेत. मुंबई महापालिका सोडल्यास इतर २८ महापालिकांमध्ये चार सदस्यी प्रभाग पद्धत असल्याने तिथे चारवेळा मतदान करायचं आहे. यामुळे मतदारांचा वेळ जात असल्याचं बोललं जातंय. यावरच मनसे नेते अविनाश जाधव यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ठाण्यात मतदान केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

“मुंबई, ठाणे वाचवायची असेल तर तुम्हाला ठाकरेंबरोबर उभं राहावं लागेल. शिवसेना आणि मनसेला प्रचंड मतांनी विजय करा. तरच मराठी माणूस जिवंत राहील”, असं अविनाश जाधव म्हणाले.

५०-५५ टक्क्यांच्या वर मतदान होणार नाही

“५०-५५ टक्क्यांच्या वर मतदान होणार नाही. कारण अर्धातास-एकतासांनंतरही मतदान होत नाहीय. आज चारवेळा मतदान करायचं आहे, त्याकरता मोठी रांग वाढत आहे. त्यातून मशिन बंद पडत असतील तर ५०-५५ टक्क्यांच्यावर मतदान होताना आतातरी दिसत नाहीय”, अशी शंकाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पुढे ते म्हणाले, “मतांची टक्केवारी कमी झाली तर सर्वांनाच फटका बसेल, पण दोषी निवडणूक आयोग असेल. कारण त्यांच्या चार चार मतांची सरकारच्या दलालांची कामं सुरू आहेत. एक माणूस एका प्रभागातून निवडून येऊ शकतो.”

…तर निवडणूक आयोग जबाबदार

“मशिनमध्ये गोंधळ असल्याने मतदानाचा टक्का कमी होणार आहे. हा टक्का कमी झाला तर याला सर्वस्वी जबाबदार निवडणूक आयोग असणार आहे”, असंही ते म्हणाले.

ठाण्यात ६४९ निवडणुकीच्या रिंगणात

ठाणे महापालिका क्षेत्रात १६ लाख ४९ हजार ८६९ इतके मतदार आहेत. त्यामध्ये ८ लाख ६३ हजार ८७८ पुरुष, ७ लाख ८५ हजार ८३० महिला आणि १५९ इतर मतदार आहेत. या निवडणुकीसाठी ९ प्रभागांमध्ये ११ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये आहेत. या निवडणुकीसाठी ११०७ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रियेत एकूण ९९ उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते. तर, १ आणि २ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी एकूण २६९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यामुळे एकूण ६४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ठाण्यात शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

या निवडणुकीकरीता ३३ प्रभागांमध्ये एकूण २०१३ मतदान केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत. मतदान केंद्रांवर एकूण १२ हजार ६५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. यात एकूण ११ विभागांमध्ये ४५ ठिकाणी एकूण ३०५ संवेदनशील आणि अतिसंवेदनशील ठिकाणे असून या ठिकाणी एकूण ७०१ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मतदान केंद्रांवर सर्व आवश्यक सुविधा तसेच मदतीसाठी स्वयंसेवक, दिव्यांगासाठी व्हीलचेअर, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोय, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.