व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. आज सकाळपासूनच कोल्हापूर शहरातील व्यवहार पूर्णतः बंद होते. तर संबंधित तरुणांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनाने शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान याप्रकरणावर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली असून पडद्यामागे जे कोणी असतील त्यांची सखोल चौकशी केली जाणार असल्याचा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे. ते टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. हेही वाचा >> हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला हिंसक वळण; मोबाईलवरील आक्षेपार्ह स्टेटस प्रकरण "कोल्हापुरात हिंसाचार सुरू झाल्यानंतर दोन ते तीन वेळा मी कोल्हापूरच्या जिल्हा प्रमुखांसोबत संपर्कात आहे. जमावाला शांततेच्या मार्गाने पांगवण्याचं आमचं पहिलं प्राधान्य आहे. काही प्रमाणात जमावाकडून गाड्यांची मोडतोड झाली, त्यामुळे जमावाला सौम्य पद्धतीने पांगवण्याचं काम पोलिसांकडून झालं", अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली. "जमाव प्रक्षुब्ध का झाला यावर सर्वांत आधी विचार केला पाहिजे. एकाएकी जमाव प्रक्षुब्ध होत नाही. औरंगजेबाचे फोटो डोक्यावर घेऊन काही लोकांनी संभाजीनगरमध्ये मिरवणूक काढली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या विचाराने चालणारा हा महाराष्ट्र आहे. क्रुरकर्मा औरंगजेबाने चाळीस दिवस अतोनात छळ करत संभाजी महाराजांचा वध केला. अशा औरंगजेबाचे फोटो घेऊन कोणी नाचत असेल तर जमाव प्रक्षुब्ध होतो", असं शंभूराज देसाई म्हणाले. हेही वाचा >> औरंगजेबाच्या फोटोप्रकरणी संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, “…तर पाकिस्तानात निघून जावं” "त्यामुळे याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. हे करणारे कोण आहेत? डोक्यावर फोटो घेऊन नाचवणारे पडद्यामागे कोण आहेत? याचा शोध घेतला पाहिजे. आज मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पोस्ट करणारे, फोटो डोक्यावर घेऊन नाचवणारे आणि त्यांच्या मागे जे कोणी आहेत त्यांची सायबर सेलमार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करणार आहे. वेळप्रसंगी राज्याच्या गुप्तचर खात्याकडून त्यांची चौकशी झाली पाहिजे. गेले ११ महिने महाराष्ट्रात शांततेचं वातावरण आहे, विकासाची कामे सुरू आहेत. त्याला खिळ बसवण्यासाठी, गालबोट लावण्यासाठी जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रात कोणी करतंय का याच्या खोलवर जाणं गरजेचं आहे", असंही शंभूराज देसाई म्हणाले.