scorecardresearch

कोल्हापूर, कोकण परिसरात व्याघ्रदर्शन; आठ वाघांची हालचाल कॅमेऱ्याने टिपली

वाघ दर्शनाचा शोध घेणाऱ्या एका पथकाला अखेर कोल्हापूर आणि दक्षिण कोकण भागात व्याघ्र दर्शन झाले आहे.

कोल्हापूर, कोकण परिसरात व्याघ्रदर्शन; आठ वाघांची हालचाल कॅमेऱ्याने टिपली
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

कोल्हापूर : वाघ दर्शनाचा शोध घेणाऱ्या एका पथकाला अखेर कोल्हापूर आणि दक्षिण कोकण भागात व्याघ्र दर्शन झाले आहे. या पथकाला या भागात ८ वाघांचा वावर असल्याचे आढळले आहे. सह्याद्री खोऱ्यात व्याघ्र प्रकल्प राबवण्याच्या प्रकल्पाला दिलासा देणारी ही बाब ठरली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील सह्याद्री खोऱ्यात वाघांचा वावर असल्याची चर्चा होती. या भागातील रहिवाशांच्या पशुधनाची वाघांकडून शिकार होत असल्याच्या तक्रारीही वनविभागाकडे दाखल झाल्या होत्या. स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरणही होते.

  गेली काही वर्ष वाघांचा या भागातील मागोवा घेतला जात होता. वाघांची नर – मादी जोडी या परिसरात असल्याचे आढळले होते. याशिवाय आणखीही काही वाघ या भागात असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे होते. त्यावर वाघांच्या हालचालींचा शोध घेण्यासाठी वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट व वन विभाग यांनी ट्रॅप कॅमेऱ्याच्या मदतीने शोध मोहीम सुरू ठेवली होती. शेजारच्या गोवा, कर्नाटक राज्यातील घनदाट जंगलातून वाघ येत असल्याची खबर होती. त्याआधारे या भागात गतवर्षी नोव्हेंबर ते एप्रिल या कालावधीत २२ ठिकाणी कॅमेरे बसवले होते. त्यामध्ये आठ वाघांचे दर्शन घडले असल्याचे वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्टचे गिरीश पंजाबी यांनी सांगितले.

   कोल्हापूर परिसरात व्याघ्रदर्शन घडल्याच्या शोधाला कोल्हापुरातील वनविभागानेही दुजोरा दिला आहे. राधानगरी अभयारण्यात वाघांचा वावर असल्याचे अधून मधून दिसत होते. आता या अंदाजावर मोहर उमटली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अंतर्गत कोल्हापुरात वाघांचा वावर असल्याची घटना दिलासा आणि आनंददायी आहे, असे विभागीय वन अधिकारी विशाल माळी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या