महसूलमंत्री आणि साखर-सहकारसम्राट यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात सर्व नऊ नगरपालिकांसाठी चुरशीने मतदान झाले. किरकोळ मारहाणीचे प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. सर्वाधिक मतदान मुरगूड पालिकेसाठी नव्वद टक्के इतके झाले, तर राज्यात सर्वात मोठय़ा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी पालिकेसाठी सुमारे ८० टक्के मतदान झाले. येथे रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. जिल्ह्यातील नागरी भागावर वर्चस्व कोणाचे याचा फैसला सोमवारी होणार आहे.

[jwplayer uKgm2S1B]

जिल्ह्य़ातील नऊ नगरपरिषदांसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदानास प्रारंभ झाला.  ४७२ मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असून दुपारी दीडवाजेपर्यंत ४४.२१  मतदान झाले. या निवडणुकीसाठी जिल्ह्य़ातील ४७२ मतदान केंद्रांवर ३ लाख ६२ हजार ३७६ इतके मतदार होते. या निवडणुकीमध्ये यंदा प्रथमच जनतेतून थेट नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे, हा फार मोठा अधिकार कायद्याने मतदारांना मिळाला होता. त्यामुळे मतदारांना प्रभागातील २ नगरसेवक व १ नगराध्यक्ष असे ३ मते द्यावी लागली.  त्यामुळे काही मतदारांचा गोंधळ होत राहिला.

सकाळी साडेसात वाजल्यापासूनच जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रातील बहुतेक मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली होती. अनेक केंद्रांवर  महिलांची मतदानासाठी मोठी रांग लागली होती. महिला मतदार गटागटाने मतदान केंद्रांवर मतदानासाठी येत होत्या. काही तरुण मतदार प्रथमच  मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी सक्रिय झाले होते. कोठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी पोलीस यंत्रणेने घेतली.

जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांमध्ये दुपारी दीड वाजेपर्यंत ४४.२१ टक्के इतके मतदान झाले. यामध्ये इचलकंरजी नगरपालिकेमध्ये ४०.७५ टक्के, जयसिंगपूर-३७.९४, कुरुंदवाड-५४.०३, वडगाव-५१.०८, मलकापूर ५८.९०, पन्हाळा ७०.७०, कागल ५६.५४, मुरगुड-६५.४१ आणि गडिहग्लज नगरपालिकेमध्ये ४६.९६ टक्के मतदान झाले होते. सकाळी ७.३० ते ९.३० या पहिल्या दोन तासात १०.६१ टक्के मतदान झाले होते तर ११.३० ते १.३० या दोन तासांत २६.०५ टक्के मतदान झाले आणि ११.३० ते १.३० या दोन तासात ४४.२१ टक्के मतदान झाले.

इचलकरंजीमध्ये लाठीमार

इचलकरंजी सार्वत्रिक नगरपालिका निवडणुकीवेळी काही मतदान केंद्रांवर उमेदवारांचे समर्थक गर्दी करून होते. राधाकृष्ण विद्यालय, शाळा क्र.२, धन्य ओळ परिसरामध्ये १२ वाजण्याच्या सुमारास दोन गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांना बघण्याच्या कारणावरून वादावादीचे प्रकार घडले. दोन्हीं गटातील कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार  केला.त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त तनात करण्यात आला आहे.

मतदान टक्केवारी

६० नगरसेवक, १ नगराध्यक्ष निवडून द्यावयाच्या इचलकरंजी पालिकेच्या निवडणुकीसाठी २ लाख २० हजार मतदार होते. येथे सुमारे ८० टक्के मतदान झाले. मुरगूड पालिकेसाठी सर्वाधिक ९०.१२ टक्के मतदान झाले , येथे मतदार संख्या ४३३९ आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यात कागल पालिकेसाठी लक्षवेधी लढत होत आहे, येथे २१ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे ८७.५२ टक्के मतदारांनी मतदान केले. गडिहग्लज पालिकेतही याच दोघात लढत होत असून येथे ९८.३७ टक्के मतदारांनी मतदान केले. जयसिंगपूर पालिकेसाठी सुमारे ७८ टक्के मतदारांनी मतदान केले. अन्य पालिकांची मतदान टक्केवारी याप्रमाणे – कुरुंदवाड – ८६ , मलकापूर ८६ , पन्हाळा – ९२ टक्के.

[jwplayer UyWFIua2]