जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी २ लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना येथील नगररचना विभागाचे सहायक संचालक समीर अरविंद जगताप यांना बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याबाबत राजेंद्र शरश्चंद्र देसाई यांनी तक्रार दाखल केली होती.
राजेंद्र देसाई हे येथील व्यावसायिक हेंमतकुमार शहा यांच्याकडे बांधकाम अभियंता म्हणून सेवेत होते. शहा यांनी ४ हजार ४४२ चौरस मीटर जमीन लिलावाद्वारे सन २०१० मध्ये खरेदी केली होती. त्याच्या नावनोंदणीसाठी अडचणी आल्याने त्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. न्यायालयाने शहा यांच्या बाजूने निकाल दिला होता. त्या आधारे राजेंद्र देसाई यांनी नगररचना विभागाकडे नावनोंदणी व खरेदी-विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी समीर जगताप यांच्याशी संपर्क साधला होता. या कामी जगताप यांनी २५ लाख रुपये लाच मागितली होती. तथापि ५ लाख रुपये देण्याचे ठरले. त्यातील २ लाख रुपये देसाई यांच्याकडून जगताप यांनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या कार्यालयात स्वीकारले. रंगेहाथ पकडल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.