महापालिकेच्या वतीने शहराच्या हद्दीतील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याबाबत प्रसिद्ध केलेल्या यादीमुळे जनतेमध्ये प्रक्षोभ निर्माण झाला असल्यामुळे पारंपरिक व जुनी धार्मिक स्थळे यादीतून वगळावीत, अशी मागणी भाजप-ताराराणी पक्षाच्या नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली. भाजप-ताराराणी पक्षाच्या २८ नगरसेवकांनी आयुक्त पी. शिवशंकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की महापालिकेच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांच्या यादीत अनेक मंदिरे खूप जुनी व पारंपरिक आहेत. पण महापालिकेकडून झालेले सर्वेक्षण चुकीचे आहे. त्यामुळे या धार्मिक स्थळावर कारवाई केल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा प्रशासनाने विचार केलेला नाही. त्यामुळे या प्रसिद्ध केलेल्या यादीतील १३० धार्मिक स्थळांपैकी पारंपरिक व जुनी धार्मिक स्थळे वगळावीत व एक समिती नेमून फेरसर्वेक्षण करावे. या समितीमध्ये लोकप्रतिनिधींचा समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली.