सातारा: पुणे-बंगळूर महामार्गावरील खंबाटकी घाटातील नव्या बोगद्याची व नव्या मार्गिकेची शनिवारी (दि. १७) चाचणी घेण्यात आली. या बोगद्यातून पुढील आठ दिवस वाहने सोडण्यात येणार असून, या काळात या नव्या मार्गिकेचा अभ्यास केला जाणार आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी, महामार्गाचे विभागीय अधिकारी ए. श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत ही चाचणी घेण्यात आली. दरम्यान, हा बोगदा सुरू झाल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुखकर होणार असून, वाहनचालक व प्रवाशांची वाहतूक कोंडीपासून मुक्तता होणार आहे.

पुणे-बंगळूर महामार्गावरील खंबाटकी घाटातील वाहतूक कोंडी आणि त्यामुळे प्रवासाला होणारा विलंब टाळण्यासाठी यापूर्वी पुण्याहून साताऱ्याकडे जाण्यासाठी खंबाटकीतील घाटवाटेचा मार्ग हा एकेरी करण्यात आला. तर साताऱ्याहून पुण्याकडे येण्यासाठी बोगदा तयार करत स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आला. या स्वतंत्र व्यवस्थेमुळे गेली काही वर्षे वाहतूक सुरळीत आणि गतिमान राहिली. मात्र, गेल्या काही वर्षांत या मार्गावरील वाहनांच्या संख्येत पुन्हा वाढ झाल्याने हा एकेरी मार्ग आणि बोगदा मार्ग अपुरा पडू लागला. त्यामुळे नवीन बोगद्यांची कामे हाती घेण्यात आली. नव्याने होत असलेला या बोगदा प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामासाठी ९२६ कोटी रुपये खर्च येणार आहे.

सातारा-पुणे महामार्गावर प्रतिदिन २२ हजार असणारी वाहनांची संख्या आता ५५ हजारांवर पोहोचली आहे. या मार्गावरील वाहनांची संख्या वाढल्यानेदेखील कोंडी आणि अपघाताचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले होते. खंबाटकीच्या नवीन बोगद्यासाठी वेळे गावापासून (ता. वाई) हरिपूर ते खंडाळा दरम्यान ६.३ किलोमीटर लांबीचा नवीन सहापदरी रस्ता होत आहे. यामध्ये दोन स्वतंत्र बोगद्यांचे नियोजन आहे. १६.१६ मीटर रुंद व सुमारे ९.३१ मीटर उंच असणाऱ्या या बोगद्यांमध्ये प्रत्येकी तीन मार्गीकेचे रस्ते तयार होत असून, येथून दुहेरी वाहतूक होणार आहे. बोगद्यातून रस्त्याच्या दुतर्फा पादचारी मार्गही ठेवला आहे. अत्याधुनिक सर्व यंत्रणांसह हा बोगदा तयार करण्यात आला. बोगदा रस्त्यावर आपत्कालीन रस्ताही बनवण्यात आला आहे. त्याचा उपयोग अपघातप्रसंगी वाहतूक सुरळीत करण्यासाठी होणार आहे.

नव्या बोगद्याने वाहतूक सुरळीत

खंबाटकी घाटातील नव्या बोगद्याची आज चाचणी घेण्यात आली आहे. सुरुवातीला वाहने जात असताना काही अडथळे येत आहेत का, याची पाहणी करण्यात येणार आहे. यासाठी सातारा बाजूकडून पुण्याकडे हलकी वाहने या बोगद्याच्या मार्गावरून जातील. अवजड वाहने जुन्या बोगद्यातूनच पुण्याकडे जातील. सुरुवातीला काही दिवस काही तांत्रिक बाबी तपासण्यासाठी हा मार्ग सुरू राहील. याची खात्री झाल्यावर हा मार्ग कायमचा सुरू करण्यात येईल. हा मार्ग चांगला झाला असून, यामुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत होईल आणि पुणे- मुंबईकडे जाण्यायेण्याच्या मोठ्या समस्या सुटतील असे साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले.