सांगली : नवरात्रोत्सवासाठी तुळजाभवानी ज्योत आणत असताना आटपाडी तालुक्यातील कौठुळीच्या दोन तरूणांचा दुचाकीच्या अपघातात दुर्दैवी अंत झाला. यामुळे उत्साहात साजर्‍या होणार्‍या दसरा उत्सवावर शोककळा पसरली आहे.

तुळजापूरहून ज्योत घेऊन परतत असताना झालेल्या भीषण अपघातात संभाजी प्रल्हाद कदम (वय ४०) आणि राजेश आप्पासाहेब कदम (वय ३८) या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नवरात्र उत्साहात असलेल्या कौठुळी गावावर या घटनेने दु।खाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

आटपाडी तालुक्यातील कौठुळी येथील भवानी नवरात्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवानिमित्त देवीची ज्योत आणण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी शनिवारी गावातील सुमारे २५ ते ३० युवक पिकअप व्हॅन आणि तीन मोटारसायकली घेऊन भक्तिभावाने तुळजापूरला गेले होते. देवीची ज्योत आणण्याचा उत्साह, नवरात्रोत्सवाची लगबग आणि गावात परतल्यानंतर होणार्‍या स्वागताची ओढ अशा वातावरणात या युवकांचा प्रवास सुरू होता.

तुळजापूर येथून देवीची ज्योत घेऊन परतत असताना मध्यरात्रीच्या सुमारास तुळजापूर-धाराशिव मार्गावर गावातील पानठेला चालक संभाजी कदम आणि गलाई व्यावसायिक राजेश कदम प्रवास करत असलेली मोटारसायकल घसरली. त्याचवेळी पाठीमागून येणार्‍या अज्ञात वाहनाने धडक दिली . या भीषण अपघातात गंभीर जखमी झाल्याने दोघांचाही मृत्यू झाला.

दोन्ही तरूणांच्या अपघाती निधनाची बातमी कौठुळीत पोहोचताच गावात शोककळा पसरली. दोन्ही कुटुंबांतील सदस्यांवर दु।खाचा डोंगर कोसळला. नवरात्रोत्सवाच्या मंगलमय वातावरणात घडलेल्या या दुर्घटनेमुळे गावातील आनंदावर विरजण पडले आहे. उत्सवाच्या तयारीत असलेल्या गावाला या घटनेने सुन्न केले. दोन्ही युवकांच्या अकाली निधनाने त्यांच्या मित्रपरिवारासह ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

रविवारी सायंकाळी दोन्ही तरूणांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ, नातेवाईक आणि मित्रपरिवाराने जड अंत:करणाने त्यांना अखेरचा निरोप दिला.