सोलापूर: माढा तालुक्यातील सीना-माढा जलसिंचन योजनेचे हक्काचे पाणी मिळत नसल्याने ‘गाव विकणे आहे’ असा फलक लावून आंदोलन करणाऱ्या तुळशी येथील ग्रामस्थांनी अखेर १६ दिवसांनंतर आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी बुधवारी गावाला प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांशी सविस्तर संवाद साधला. त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत चावडीवरील ‘तुळशी गाव विकणे आहे’ हा फलक खाली उतरवला.

या वेळी, “तुमच्या आश्वासनावर भरोसा ठेवून आम्ही आंदोलन स्थगित करत आहोत, आम्हाला न्याय द्या,” अशी विनंती गावकर्यांनी केली. सीना-माढा उपसा जलसिंचन योजना सुरू झाल्यापासून तुळशी गाव पाण्यापासून वंचित राहिले आहे. अनेक निवेदने देऊनही प्रश्न न सुटल्याने तसेच सुधारित प्रशासकीय मान्यता व निधी न मिळाल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी गावात ‘गाव विकणे आहे’ असा फलक लावून लक्षवेधी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाची राज्यभरात मोठी चर्चा झाली होती.

दरम्यान, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी बुधवारी तुळशी गावाला भेट देऊन पाणीपुरवठा योजना, तलाव व इतर जलस्रोतांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर ग्रामस्थांशी चर्चा करताना त्यांनी, “प्रस्तावित योजनांच्या मंजुरीसह पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय पातळीवर दर दहा दिवसांनी आढावा घेतला जाईल आणि त्याची माहिती ग्रामस्थांना दिली जाईल,” असा विश्वास दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः चावडीतील फलक उतरवल्यानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आंदोलनाला तात्पुरती स्थगिती दिली. या वेळी प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार संजय गायकवाड, सरपंच डॉ. शरद मोरे यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“नवीन पाणीपुरवठा योजना १४ कोटींची असून, जलवाहिनी व मोटार बदलण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेची योजना २३४ कोटी रुपयांची आहे. दीर्घकाळ झालेल्या दुर्लक्षामुळे आम्हाला हे पाऊल उचलावे लागले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन दर दहा दिवसांनी पाठपुराव्याचा आढावा शिष्टमंडळाला देण्याचे मान्य केल्याने आम्ही आंदोलन तूर्तास स्थगित केले आहे.” डॉ. शरद मोरे, सरपंच, तुळशी