दुचाकीवरून पाठलाग करून कोल्हापूर-सांगली रोडवर मजलेनजीक प्रवासी दाम्पत्याला लुटणा-या इचलकरंजीतील दोघा चोरटय़ांना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. तौफिक ताजुद्दीन मुल्ला (वय ३०) व मन्सूर अबुबकर शेख (वय २७, दोघे रा. सोलगे मळा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वाटमारीची ही घटना २२ ऑगस्ट रोजी घडली होती. हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, २२ ऑगस्ट रोजी सांगली-कोल्हापूर रस्त्यावर अज्ञातांनी एका दाम्पत्याचा मोटारसायकलवरून पाठलाग करत मजले (ता. हातकणंगले) नजीक त्यांच्याकडील बॅग हिसकावून घेऊन पोबारा केला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमून चोरटय़ांचा शोध घेतला जात होता. ही लूटमार इचलकरंजीतील दोघांनी केल्याची माहिती खब-याकडून मिळाली होती. त्यानुसार सांगली नाका येथे सापळा रचून तौफिक मुल्ला व मन्सूर शेख यांना मोटारसायकलीसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी करता त्यांनी वरील गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली हीरो होंडा पॅशन प्रो मोटारसायकल, कॅमेरा, इलेक्ट्रिक शेगडी, मोबाइल असा ६८ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई सपोनि विकास जाधव, रमेश खुणे, पोउनि गजेंद्र पालवे, सुशील वंजारी, सचिन पंडित, पोहेकॉ राजू शेटे, संभाजी भोसले, संग्राम पाटील, अनिल ढवळे, जितेंद्र भोसले, अमर अडसुळे, अमित सर्जे, राजेंद्र निगडे आदींच्या पथकाने केली.