सातारा : नऊ दिवस अनवाणी पायांनी सतत उभे राहायचे, झोप आली तरी जमिनीवर न टेकता मंदिरात टांगलेल्या पाळण्यावर छाती टेकवून डुलकी घ्यायची, तेल-मीठ-तिखटविरहित आहार आणि ९ दिवस गावची वेस ओलांडायची नाही. ऐकायला अंगावर काटा आणणारे हे कडक व्रत सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पांडे गावात आजही तितक्याच श्रद्धेने पाळले जाते. सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या ग्रामदैवत काळभैरवनाथाच्या ‘उभ्याचे नवरात्र’ या सोहळ्याने सध्या संपूर्ण पांडे गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले आहे.

या अनोख्या आणि खडतर व्रतात गावातील सुमारे ३५० ते ४०० नवसकरी (करी) सहभागी झाले आहेत. घटस्थापनेच्या पहाटे स्नानानंतर धूपारती व काळभैरवनाथाच्या पालखी प्रदक्षिणेने उत्सवाला प्रारंभ होतो. काळभैरवनाथाला ज्यांनी नवस केला आहे, असे ग्रामस्थ उभ्याचे नवरात्र पाळतात. या काळात नऊ दिवस जमिनीवर बसायचे नाही. पायात चप्पल घालायची नाही, गावची वेस ओलांडायची नाही. आजारी पडले तरी औषध घ्यायचे नाही. तिखट-मीठ खायचे नाही. जे काही करायचे ते उभे राहूनच. प्रत्येकाच्या अंगावर पांढरे शुभ्र कपडे असतात, नवसकरी हातात आधारासाठी आणि व्रताच्या स्मरणासाठी काठी बाळगतात. सर्व दैनंदिन व्यवहार, फराळ आणि धार्मिक विधी उभ्यानेच केले जातात. रात्रीच्या विश्रांतीसाठी भैरवनाथ व विठ्ठल मंदिरात दोरीचे झोपाळे बांधले जातात. झोप आल्यास या झोपाळ्याचा आधार घेऊन एक पाय जमिनीवर ठेवूनच विश्रांती घ्यावी लागते.

छायाचित्र सौजन्य – लोकसत्ता टीम

पुणे-बंगळूर महामार्गावरून बोपेगाव फाट्यावरून चार किलोमीटर अंतरावर असणारे पांडे हे बारा बलुतेदारांचे गाव आहे. या गावात व्रतादरम्यान ७५ टक्के ग्रामस्थ उपवास पाळतात. नवसकऱ्यांच्या आहारात केवळ दूध, फळे आणि साध्या पदार्थांचा समावेश असतो. उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात गावातील हिंदूंबरोबरच मुस्लिम बांधवही मोठ्या श्रद्धेने सहभागी होऊन सामाजिक सलोख्याची वीण घट्ट करतात.

दिवसभर धार्मिक वातावरण आणि रात्री भजन, कीर्तन, गोंधळ व वाघ्या-मुरळीच्या कार्यक्रमांनी लोकपरंपरेचे दर्शन घडते. अष्टमीच्या रात्री पेढे वाटून मोठा जागर केला जातो. नवमीला देवाला कौल लावून पुढील वर्षाचे नवस बोलले जातात. विजयादशमीला (दसरा) देवाला कौल लावून सीमोल्लंघनाची दिशा ठरवली जाते. हद्दीवर जाऊन आपट्याची पाने वाटून ‘सोने लुटल्या’नंतर उपवास सोडून या साडेतीनशे वर्षांच्या ऐतिहासिक व्रताची उत्साहात सांगता होते.

छायाचित्र सौजन्य – लोकसत्ता टीम

श्रद्धेमुळे या खडतर व्रताचे बळ मिळते. काळभैरवनाथ कुटुंबावर सदैव छत्रछाया धरतो, असा आमचा दृढ विश्वास आहे, अशी भावना नवसकरी राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केली. तर, ही केवळ धार्मिक निष्ठा नसून, मराठी संस्कृतीतील सामूहिक शिस्त व एकजुटीचे मूर्तिमंत उदाहरण आहे, असे माजी सरपंच किरण जाधव यांनी सांगितले.