कोल्हापूर : मराठी भाषकांची अस्मिता असलेले बेळगाव शहराचे नाव कर्नाटक शासनाने जाणीवपूर्वक बेळगावी असे कानडी स्वरूपात रूपांतरित केल्याने सीमावासीयांकडून संताप व्यक्त केला असताना आज उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या बेळगाव जिल्ह्याच्या शासकीय दौरा पत्रकावर बेळगावी असा झाला आहे. यामुळे सीमाबांधवांनी तीव्र संताप व्यक्त केला. यावर मंत्री सामंत यांनी त्या पत्रावर काय उल्लेख झाला याची मला कल्पना नाही, असे सांगत चुकीची दुरुस्ती निश्चित केली जाईल. आमच्यासाठी बेळगाव शहर नेहमीच बेळगावच असेल, असे आवर्जून सांगितले.
चंद्रकांतदादाही वादात
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यापूर्वी वादात सापडले होते. विशेषतः २०२२ मध्ये त्यांनी एका कन्नड गीताचा संदर्भ देत”महाराष्ट्रात जन्म घ्यावा तर कर्नाटकात’ असे वक्तव्य केल्याचा मुद्दा गाजला होता. या विधानामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या होत्या. पाटील यांच्या भूमिकेवर आणि त्यांच्या वक्तव्यांवर विरोधकांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादीने सडकून टीका केली होती.
मराठा आंदोलनात शिंदेशाही
मनोज जरांगे यांनी काल रात्री आपले उपोषण मागे घेतले. यावेळी नेहमीच मध्यस्थी भूमिका घेणारे एकनाथ शिंदे कुठेच दिसले नाहीत या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही एकनाथ शिंदे यांची आग्रही भूमिका राहिली आहे. फडणवीस सरकार याबाबत सकारात्मक पावले उचलत आहे. अन्य कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न देता मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपण सातत्याने त्यांच्या संपर्कात होतो. मागण्या पूर्ण होतीलच तरीही मनोज जरांगे यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे. आंदोलनाच्या शिष्टाईत श्रेय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काल रात्री उशिरापर्यंत आम्ही प्रसाद लाड यांच्यामार्फत मनोज जरांगे यांच्या संपर्कात होतो. त्यामुळे यावेळच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या शिष्टाईत शिवसेना दिसत नाही हा गैरसमज असल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले.
बेळगावात सामंतांचे स्वागत
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रविवारी बेळगावला भेट दिली. त्यांचे मराठी भाषकांनी स्वागत केले. या भेटीवर मंत्री सामंत यांनी एक्स वर प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यामध्ये सामंत यांनी म्हटले आहे की, आज बेळगाव भेटीदरम्यान ‘महाराष्ट्र एकत्रीकरण समितीच्या’ वतीने करण्यात आलेल्या आपुलकीच्या सत्काराने मन भारावून गेले. सीमाभागातील मराठी अस्मिता आणि संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र एकत्रीकरण समितीने अविरतपणे दिलेला लढा आणि केलेले कार्य सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी आहे. हा सत्कार म्हणजे केवळ माझा सन्मान नसून, महाराष्ट्र आणि सीमाभागातील मराठी भाषिकांमधील घट्ट नाते अधोरेखित करणारा क्षण आहे. सीमाभागातील मराठी माणसाची अस्मिता आणि बंधुभाव अधिक दृढ करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.
