कोल्हापूर : क्रिकेटवेड्या उदय धातुंडे या तरुणाने इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीत महत्त्वाची विकेट मिळवत नेतृत्वाचे लक्ष वेधले. खिलाडूवृत्ती, सालस, सामाजिक भान, कोरा करकरीत चेहरा असलेल्या या तरुणाकडे मग इचलकरंजी महापालिकेचे पहिले महापौरपद चालून आले. वासुदेव गोंधळी या उपेक्षित समाजातील तरुणाला वस्त्रनगरीच्या प्रथम नागरिकाचे मानाचे स्थान मिळाल्याने या समाजाने थेट महापालिकेतच आज आनंदाने गोंधळ मांडला ! इचलकरंजी नगरपालिकेची स्थापना १८९३ साली पारतंत्र्यात झाली. तेव्हा ब्रिटिशांकडून नगरपालिकेमध्ये प्रतिनिधी निवडले जात होते. १९४५ साली बाळासाहेब चिवटे हे पत्रकार असलेले सामाजिक कार्यकर्ते नगरीचे पहिले नगराध्यक्ष झाले. देश स्वतंत्र झाल्यानंतर मृगेंद्रअण्णा सुलतानपुरे हे पहिले नगराध्यक्ष बनले.

तीन वर्षांपूर्वी नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाले. पहिल्याच निवडणुकीत महायुतीचे बाजी मारली. भाजपकडे मुबलक संख्याबळ असल्याने इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी महापौर पद मिळवण्यासाठी नगरसेवकांत स्पर्धा रंगली. माध्यमांमधून अनेकांच्या नावाची चर्चा सुरू होती. काहींनी ती सुरू ठेवली. पण ही माळ एका सुस्वभावी तरुणाकडे जाणार होती, याची मात्र कोणालाच कल्पना नव्हती. ती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केल्यानंतर समजली आणि आज उदय धातुंडे हे नगरीचे महापौर म्हणून निवडले गेले. तेही बिनविरोध !

भंगाराचे झाले सोने !

एकेकाळी भंगार गोळा करीत उदरनिर्वाह करणाऱ्या उदय या तरुणाने पुढे ॲल्युमिनियम पासून भांडी निर्मितीचा कारखाना सुरू केला. स्थिरावलेल्या उदयने सामाजिक कार्यात लक्ष पुरवले. क्रिकेट हा आवडीचा छंद कायमचा जोपासला. इचलकरंजीतील सर्वांत मोठे राजाराम स्टेडियम हे लेदर बॉल चेंडूसाठी आरक्षित झाल्यानंतर सर्वाधिक संख्येने खेळल्या जाणाऱ्या टेनिस बॉल शौकिनांना मैदान शोधण्याची वेळ आली. अशा वेळी या क्षेत्रातील तरुणांना संघटित करत उदय धातुंडे यांनी नगरपालिकडे पाठपुरावा केला. जिम्नॅशियम मैदान हे टेनिस बॉल चेंडूसाठी आरक्षित करण्यात यश मिळवले. तेव्हापासून उदय हे क्रीडा क्षेत्रात नाव चर्चेत आले.

गोलंदाजाची कमाल

उदय हे ‘इन स्विंग’ गोलंदाज म्हणून तरबेज. अष्टपैलू खेळाडूंनी अनेक राज्यातून अजिंक्यपदाची अनेक बक्षिसेही मिळवलेली. असा चेंडू फलंदाजाची यष्टी कधी उखडतो हे कळतही नाही. महापालिकेच्या निवडणुकीत उदय यांच्यासमोर २०१९ सालची विधानसभा निवडणूक लढवलेले राहुल खंजिरे हे तगडे उमेदवार होते. खंजिरे यांच्यामुळे या प्रभागातील सर्व चारही जागा येणार, अशी अटकळ अगदी भाजपनेही बांधली होती. तथापि उदय यांनी वेगळी रणनीती वापरत सर्व जागावर विजय मिळवतानाच राहुल यांचीही राजकीय खेळातून यष्टी उडवली. या खेळीच्या माध्यमातून तेव्हापासून ते राजकीय नेतृत्वाच्या डोळ्यात भरले गेले. नेतेमंडळीही पहिला चेहरा देताना तो वादग्रस्त किनार असलेली नसावा अशा विचारात होते.

सामाजिक भान – मानाचे पान

करोना संसर्ग काळात रुग्णांना मदत करण्यासाठी धडपडणारे उदय यांनी आई लक्ष्मीबाई या नगरसेविका झाल्यानंतर प्रभागात चांगला संपर्क ठेवला होता. त्यांची कार्यशैली ही लाल नगर या झोपडपट्टी परिसरात सर्वांना परिचयाची होती. अविकसित भागात राहणाऱ्या उदय यांनी सामाजिक कामासाठी कधी वेळ – काळ पाहिले नाही. त्यांच्या एकूणच वर्तनाने त्यांचा महापौर पदाचा मार्ग सुकर केला होता. यातूनच आता ४६ वर्षीय उदय धातुंडे यांच्या रूपाने भाजपच्या महापालिकेच्या मैदानातील नव्या राजकीय इनिंगची सुरुवात झाली आहे.