सातारा : व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो, प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक वेळी आपल्याच पक्षाची परिस्थिती चांगली असेल असे नसते.त्यामुळे राज्यकर्त्याला नेहमी जमिनीवर राहून काम करावे लागते. महायुतीत राहूनच परस्परांवर राजकीय कुरघोडी करणाऱ्यांना लक्ष्य करत महायुतीत मिठाचा खडा टाकू नका असे सांगत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार महेश शिंदे यांना साताऱ्यातून थेट इशारा दिला.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी साताऱ्यातील दौऱ्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे महायुतीतील अंतर्गत मतभेदांवर थेट संदेश देत पक्षशिस्तीची स्पष्ट रेषा आखल्याचे सांगितले.
प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवण्याचा अधिकार आहे. मात्र महायुतीत समन्वय आणि परस्पर सन्मान आवश्यक आहे. सातारा आणि सोलापूरमध्ये कोणामुळे परिस्थिती निर्माण होते, हे जनतेलाही माहिती आहे असे स्पष्ट करून सामंत यांनी फलटणमधील आणि साताऱ्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमदार महेश शिंदे यांना अप्रत्यक्ष इशारा दिल्याची जोरदार चर्चा रंगली असून भाजप नेते जयकुमार गोरेंवरही नाव न घेता त्यांनी सूचक टीका केली.
सातारा जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांतील ‘बीएलए’ नियुक्तीचा आढावा घेताना सामंत यांनी शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधोरेखित केली. वाई आणि सातारा मतदारसंघात नियुक्त्या पूर्ण झाल्याचा दावा करत निष्ठावान शिवसैनिकांनाच जबाबदारी दिली जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. काही मतदारसंघांतील पदाधिकाऱ्यांवर कारवाई किंवा बरखास्तीचे संकेतही त्यांनी दिले.
महायुतीतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मिठाचा खडा पडेल अशी भूमिका कोणी घेऊ नये,असे स्पष्ट आवाहन करत सामंत यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना संघटनात्मक निष्ठा जपण्याचे आदेश दिले.
विधान परिषद निवडणुकीसंदर्भात बोलताना सामंत यांनी पुढील २४ तासांत चित्र स्पष्ट होईल,असे सांगत महायुतीचे १७ पैकी १७ उमेदवार अर्ज दाखल करतील, असा विश्वास व्यक्त केला. जागावाटपाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना सामंत यांनी सरकार सकारात्मक असल्याचे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करू नये, अशी भावनिक विनंती केली.
