सातारा : राजकारणात प्रत्येकाला महत्त्वाकांक्षा बाळगण्याचा आणि निवडणूक लढविण्याचा पूर्ण अधिकार आहे; मात्र या महत्त्वाकांक्षेचे रूपांतर आपापसांतील कटुता, हेवेदावे आणि संघर्षात होता कामा नये. नेत्यांनी राजकीय ईर्ष्या निरोगी वातावरणात राहील याचे भान ठेवून वितुष्ट टाळले पाहिजे, असा मोलाचा सल्ला खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांना दिला आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी चुरशीने मतदान पार पडले. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी मतदान केल्यानंतर सातारा शहरातील मतदान केंद्राला भेट देऊन प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेची पाहणी केली. पाहणीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी जिल्ह्यातील बदलती राजकीय समीकरणे, चुरशीच्या लढती आणि नेत्यांमधील अंतर्गत संघर्षावर अत्यंत सावध आणि मोजक्या शब्दांत भूमिका मांडली.
जिल्हा बँकेच्या एकूण जागांपैकी ९ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून उर्वरित १२ जागांसाठी रविवारी प्रत्यक्ष मतदानाची रणधुमाळी उडाली. या उरलेल्या जागांवर जिल्ह्यातील प्रमुख राजकीय दिग्गजांचे समर्थक एकमेकांसमोर ठाकल्याने राजकीय प्रतिष्ठेच्या अटीतटीच्या लढती रंगल्या आहेत. यामुळे अनेक तालुक्यांत स्थानिक मतभेद आणि कार्यकर्त्यांमधील संघर्ष तीव्र झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषद व जिल्हा बँकेच्या अनुषंगाने उफाळून आलेल्या स्थानिक राजकीय वादांशी माझा थेट संबंध नाही. या संघर्षात मला ओढण्याचा प्रयत्न करू नये, असा स्पष्ट संदेश उदयनराजेंनी दिला.
लोकशाहीत पुढे जाण्याची आणि नेतृत्व करण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे कोणाच्याही राजकीय महत्त्वाकांक्षेकडे नकारात्मक दृष्टीने पाहण्याचे कारण नाही, असे सांगत त्यांनी सर्व इच्छुकांच्या अधिकाराचे समर्थन केले. मात्र, राजकीय स्पर्धेतून व्यक्तिगत पातळीवर टोकाचा संघर्ष उफाळता कामा नये, अशी कानउघाडणीही त्यांनी केली.
सध्या जिल्ह्यात निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय आघाड्यांची जुळवाजुळव सुरू आहे. अशा नाजूक वळणावर कोणत्याही गटाची उघड बाजू न घेता उदयनराजेंनी सर्व घटकांना संयम राखण्याचे आवाहन करत तटस्थ भूमिका घेतली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील त्यांची ही समतोल भूमिका आणि स्थानिक वादांपासून राखलेले सुरक्षित अंतर सध्या सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.
