कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माझ्यावर आश्वासनाची जाहिरात केली जात आहे. आम्हांला जनसामान्यांचा विकास हवा आहे. तो हसन मुश्रीफ यांच्या रूपाने मिळण्याची खात्री असल्याने विधानसभा निवडणुकीला त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत, अशी भूमिका ठाकरेसेनेचे माजी आमदार संजय घाटगे यांनी जाहीरपणे मांडली आहे. साके (ता.कागल) येथील विविध विकासकामांचे उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ, गोकुळचे संचालक अंबरिशसिंह घाटगे उपस्थित होते. संजय घाटगे म्हणाले, भाजपात मुश्रीफ असते तर ढुंकूनही पाहिले नसते. ते राष्ट्रवादीचे समतावादी नेते असल्याने आम्ही त्यांच्या सोबत आहोत. विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे काहीही परिणाम झाले तरी बेहत्तर. आमची विचारधारा, दिशा बदलणार नाही. हेही वाचा : कुरुंदवाड मुख्याधिकाऱ्यांविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना पाठवले सक्तीच्या रजेवर मुश्रीफ तुम्हीच सांगा ! गत विधानसभा निवडणुकीत मी मुश्रीफांकडून पैसे घेऊन निवडणूक लढवल्याचे काही लोकांनी आरोप केले आहेत. मुश्रीफ तुम्ही अल्लाहची शपथ घेऊन सांगा की तुम्ही मला पैसे दिले आहेत का? असेही घाटगे म्हणाले. हसन मुश्रीफ यांनी संजय घाटगे यांच्या निर्णयाचे स्वागत केले. मी त्यांना कोणत्याही निवडणुकीत एक रुपयाही कधी कुणाला दिला नाही हे शपथपूर्वक सांगतो असेही ते या वेळी म्हणाले.