सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात जून व जुलै महिन्यात सरासरीच्या निम्मा पावसाची नोंद झालेली नसतानाही, पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरण १०० टक्केकडे वाटचाल करत आहे. सोमवारी (२७ जुलै) सकाळी उजनी धरण ९३.८७ टक्के भरले असून, धरणातील वाढता पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी भीमा नदीपात्रात सांडव्याद्वारे आणि वीज प्रकल्पासाठी ६,६०० क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.
भीमा नदीत ६,६०० क्युसेकने विसर्ग सुरू
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून दौंडमार्गे धरणात सुमारे ७० हजार क्युसेकची आवक सुरू आहे. यामुळे धरणातील पाणी पातळी सुरक्षित ठेवण्यासाठी सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून सांडव्याच्या वक्रद्वारांद्वारे ५,००० क्युसेक आणि जलविद्युत निर्मितीगृहातून १,६०० क्युसेक, असा एकूण ६,६०० क्युसेक विसर्ग भीमा नदीपात्रामध्ये सोडण्यात आला आहे. आवक वाढल्यास या विसर्गात गरजेनुसार वाढ केली जाईल, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.
वीर धरणातून नीरा नदीत ५ हजार ६०० क्युकेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पुणे-सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील नीरा-नरसिंगपूर येथे नीरा-भीमा नदीचा संगम आहे. भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढत होत असल्याने पंढरपूर येथील जुना दगडीपुलावरील वाहतूक प्रशासनाने थांबविली आहे. वारीचा मुख्यसोहळा पूर्ण झाल्यानंतर नदीची पाणीपातळी वाढत असल्याने प्रशासनास किंचित दिलासा मिळाला आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने २१ ते २६ जुलै दरम्यान नदीपात्रात स्नान करताना बुडत असलेल्या ३५ जणांना सुखरूप बाहेर काढले आहे.
सोमवारी (२७ जुलै) सकाळी उजनी धरण ९३.८७ टक्के भरले असून, धरणातील वाढता पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी भीमा नदीपात्रात सांडव्याद्वारे आणि वीज प्रकल्पासाठी ६,६०० क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.
— LoksattaLive (@LoksattaLive) July 27, 2026
(व्हिडीओ – लोकसत्ता टीम) pic.twitter.com/nfTWAAgUAM
पुण्याच्या पावसावर उजनीची भिस्त
सोलापूर जिल्ह्यात जून व जुलै महिन्यात मॉन्सूनचा पाऊस अत्यंत अल्प झाला आहे. धरणात स्थानिक परिसरातून अवघा २ टक्केही पाऊस आलेला नाही. ऐन पावसाळ्यात शेतीची पिके पाण्याअभावी वाळू लागल्यामुळे लोकप्रतिनिधींच्या मागणीवरून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशान्वये उजनीतून सीना-माढा, दहिगाव उपसा योजना, बोगदा आणि कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडावे लागले आहे. उन्हाळ्यात उणे २८ टक्क्यांपर्यंत खालावलेले उजनी धरण केवळ पुणे जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे शंभरी गाठण्याच्या मार्गावर आहे. मागील ४६ वर्षांत जवळपास १७ वेळा अशीच परिस्थिती उद्भवल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वीजपुरवठा ८ तास करण्याची मागणी
दरम्यान, वीर आणि उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीकाठच्या गावांचा शेती वीजपुरवठा ८ तास पूर्ण क्षमतेने सुरू ठेवावा, अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. जिल्ह्यात अद्याप मोठा पाऊस झाला नसल्याने कालव्यातून मोठ्या क्षमतेने पाणी सोडावे तसेच मध्यम व लघु प्रकल्प या पाण्याने भरून घेण्याबाबत विचार व्हावा, असेही खासदार शिंदे यांनी नमूद केले आहे.
नदीकाठच्या नागरिकांना इशारा
धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने भीमा नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात कोणीही उतरू नये, तसेच नदीपात्रातील साहित्य आणि जनावरे तातडीने सुरक्षित स्थळी हलवावीत व सखल भागातील रहिवाशांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.
