सोलापूर : भीमा खोऱ्यात सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातील पाण्याच्या आवक-जावक स्थितीत मोठा बदल होत आहे. परिणामी, नदीपात्रात सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग वाढवणे आणि कमी करताना धरण प्रशासनाची मोठी कसरत सुरू आहे. मंगळवारी रात्री दौंड येथील विसर्गात अचानक वाढ झाल्याने उजनी धरणातून भीमा नदीत मंगळवारी रात्री १ लाख १० हजार क्युसेक विसर्ग भीमानदीपात्रात सोडण्यात येत होता. बुधवारी पहाटे पुणे जिल्ह्यातून धरणात येणारा विसर्गात किंचीत घट झाल्याने भीमा नदीपात्रात एक लाख क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे.

मागील आठवड्यात उजनी धरणात १ लाख २४ हजार क्युसेकपेक्षा अधिक दाबाने पाणी येत असल्याने नदीपात्रातील विसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आला होता. त्याच वेळी ‘वीर’ धरणातूनही नीरा नदीत पाणी सोडल्याने पंढरपुरात भीमा नदीचा विसर्ग दीड लाख क्युसेकवर पोहोचला होता. यामुळे पंढरपूरच्या वाळवंटातील मंदिरांना पाण्याने वेढले होते, तर नदीकाठच्या झोपडपट्टीतील १०० पेक्षा जास्त कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागले होते.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांत विसर्ग कमी झाल्याने महापुराचा धोका टळला होता. मात्र, भीमा नदीवरील २३ पैकी २० कोल्हापूर पद्धतीचे बंधारे अद्याप पाण्याखालीच आहेत. पुळूज (ता. पंढरपूर) येथील बंधार्यावरील पाण्याची पातळी ओसरली असली, तरी महापुरात वाहत आलेल्या झाडांच्या फांद्या आणि काटेरी झुडपे बंधाऱ्यावर अडकून पडली आहेत. यामुळे शेतकरी व स्थानिक नागरिकांची ये-जा पूर्णपणे बंद झाली आहे.

पाटबंधारे विभागाने या बंधाऱ्याची दुरुस्ती आणि स्वच्छता न केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास दौंडहून येणारा पाण्याचा ओघ वाढल्यामुळे उजनीतून आता  पुन्हा १ लाख क्युसेक क्युसेक विसर्ग सोडण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला. यामुळे उघडे पडलेले बंधारे पुन्हा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.