सातारा: अवकाळी पावसाच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेल्या नाशिक व जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला असून, एकूण १७ कोटी ८ लाख ९० हजार (अक्षरी रुपये सतरा कोटी आठ लक्ष नव्वद हजार फक्त) इतकी मदत मंजूर करण्यात आली आहे. या मदतीमागे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची तत्परता, संवेदनशीलता आणि ठोस पाठपुरावा निर्णायक ठरल्याचे स्पष्ट होत आहे.
सप्टेंबर २०२४ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत, विशेषतः नोव्हेंबर २०२५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक व जळगाव जिल्ह्यांतील पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. हातात आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत मकरंद पाटील यांनी तत्काळ प्रशासनाला सतर्क करत नुकसानग्रस्त भागांचा सखोल आढावा घेण्याचा आदेश दिला आणि मदत प्रस्ताव जलदगतीने मंजूर करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे शासन यंत्रणा वेगाने कार्यरत झाली आणि अल्पावधीतच मदत मंजूर होऊन शेतकऱ्यांना आधार मिळण्याचा मार्ग खुला झाला. ही मदत केवळ आर्थिक साहाय्य नसून, संकटातून सावरण्याची नवी उमेद देणारी ठरत आहे. बियाणे, शेती पुनर्बांधणी आणि पुढील हंगामासाठी आवश्यक असलेला खर्च भागवण्यासाठी ही रक्कम शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरणार आहे.
मकरंद पाटील यांनी घेतलेली भूमिका ही केवळ प्रशासकीय न राहता मानवी संवेदनशीलतेची जाणीव करून देणारी ठरली आहे. शेतकऱ्यांच्या वेदना ओळखून वेळेत निर्णय घेण्याची त्यांची कार्यशैली पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. संकटाच्या काळात शासन आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे, हा विश्वास समाजामध्ये या निर्णयातून अधिक दृढ झाला आहे.
अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही मदत नव्या उमेदीची सुरुवात ठरत असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासही या निर्णयाचा मोठा हातभार लागणार आहे. पाटील यांच्या सक्रिय नेतृत्वामुळेच संकटाचे रूपांतर संधीमध्ये करण्याचा प्रयत्न यशस्वी होत असल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
