कोल्हापूर : ऊस दराच्या प्रश्नावर साखर कारखानदार आणि प्रशासनाकडून कोणतीही चर्चा न करता दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उद्या शुक्रवारी कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांत बंदची हाक दिली.या बंदला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी किणी टोल नाक्यावर राजू शेट्टी यांची भेट घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
आज सायंकाळपर्यंत ऊस दराचा तोडगा निघाला नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरून उद्याच्या बंदमध्ये ताकतीने सहभागी होईल, असा इशारा पवार यांनी दिला आहे. तर देवणे यांनी निगरगट्ट प्रशासन आणि कारखानदारांकडून शेतकऱ्यांच्या घामाचे दाम वसूल केल्याशिवाय सोडणार नाही असे ठामपणे सांगितले आहे.
मित्रपक्षांचा पाठिंबा
दरम्यान राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक सामाजिक संघटनांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवल्याने आंदोलनाची धार वाढली आहे. या भेटीप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विराज पाटील, सुनील मोदी, कोल्हापूर शहरप्रमुख विशाल देवकुळे, विनोद खोत, राहुल गिरोले, संदीप दबडे, उदयसिंह शिंदे, बाजीराव पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.
गाय-वासराचे पूजन
दुसरीकडे आंदोलनस्थळीच दिवाळी सण साजरा करताना दिसून आले. दीपावलीच्या पहिल्या दिवशी पारंपारिक पद्धतीने गाय-वासराचे पूजन करून माजी खासदार राजू शेट्टी यांनी किणी टोल नाक्यावरच आंदोलकांसोबत वसुबारस साजरी केली. कारखानदार व प्रशासनाला सुबुद्धी लाभो, अशी प्रार्थना करत बळीराजाच्या घामाचे योग्य दाम मिळेपर्यंत माघार नाही. आमची यंदाची दिवाळी रस्त्यावरच साजरी होईल आणि साखर कारखानदारांनाही आम्ही दिवाळी साजरी करू देणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.
प्रशासनाकडून संवाद
दरम्यान प्रशासनाकडून अखेर या आंदोलनाची दखल घेण्यात आली असून हातकणंगले तहसीलदारांनी आंदोलन स्थळी राजू शेट्टी यांची भेट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार संवाद साधला आहे. तथापि तोडगा निघत नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.
