कोल्हापूर : वि. स. खांडेकर यांच्या साहित्यातून उपभोगवाद, पुरुषप्रधान मानसिकता, मानवी वासनेचा संघर्ष, प्रेम, त्याग, नैतिकता आणि हिंसेविषयीची भूमिका आजच्या समाजातील अनेक प्रश्नांशी थेट संवाद साधते. खांडेकर केवळ अलंकारिक भाषेचे साहित्यिक नव्हते, तर मानवी जीवनाचे भाष्यकार होते असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी बुधवारी येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग आणि आंतरभारती शिक्षण मंडळ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वि. स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्षाच्या सांगता समारंभात वि. स. खांडेकर : सुवर्ण स्मरण या विषयावर विशेष स्मृती व्याख्यान देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव होत्या. आंतरभारती शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुचेता कोरगावकर, माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. सुनीलकुमार लवटे, खांडेकरांचे नातू डॉ. अतुल कापडी प्रमुख उपस्थित होते.

डॉ. मुणगेकर यांनी खांडेकरांच्या विविध साहित्यकृतींच्या आधारे त्यांच्या लेखनातील मानवी जीवनाचा व्यापक पट उलगडला. त्यांच्या साहित्याचा गाभा मानवी जीवनाच्या सार्वकालिक प्रश्नांशी जोडलेला असल्याने नव्या पिढीने खांडेकरांना केवळ अभ्यासक्रमापुरते न पाहता त्यांच्या साहित्याचा नव्याने शोध घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी खांडेकरांचे साहित्य हे केवळ एका पिढीपुरते मर्यादित नसून आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या युगातही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी शिवाजी विद्यापीठाने साकारलेले खांडेकरांचे स्मृती संग्रहालय म्हणजे विद्यापीठाने त्यांच्या विषयी जपलेल्या आदरभावाचेच प्रतीक असल्याचे नमूद केले. अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी साहित्यिकांच्या प्रत्यक्ष विचारांतून आणि अनुभवांतून मिळणाऱ्या संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, आज माहिती आणि भाषणे काही क्षणांत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून उपलब्ध होत असली, तरी प्रत्यक्ष दिग्गज साहित्यिकांचे विचार ऐकताना मिळणारा भावनिक आणि मानवी स्पर्श कृत्रिम बुद्धिमत्तेला पर्याय ठरू शकत नाही. खांडेकरांच्या साहित्यात केवळ एका पिढीला नव्हे, तर पुढील पिढ्यांनाही घडविण्याची क्षमता असल्याने अशा साहित्यिकांच्या विचारांशी विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष संवाद घडविणारे कार्यक्रम सातत्याने होत राहणे आवश्यक आहे.

यावेळी सुचेता कोरगावकर आणि डॉ. अतुल कापडी यांनीही खांडेकरांविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत, प्रास्ताविक व परिचय करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले.

दिवसभरात झालेल्या सत्रांमध्ये पुणे येथील प्रा. मिलींद जोशी व ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘वि.स.खांडेकर यांचे असंग्रहित लेखन व त्यांच्याविषयीचे ग्रंथ’ या विषयीचे सत्र पार पडले. अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते. या सत्रात वि.स. खांडेकर लिखित वृंदावन (कादंबरी), आगरकर चरित्र, स्मृतींची चाळता पाने (संकीर्ण), अर्ध्यदान (काव्यसंग्रह प्रस्तावना) या ग्रंथांसह आंतरभारती: उगम आणि विकास (लेखक- डॉ. सुनीलकुमार लवटे), कुमारांसाठी वि.स. खांडेकर (ले. नीलम माणगावे), वि.स. खांडेकर: साहित्यिक आणि माणूस (ले. राम देशपांडे), वि.स. खांडेकर चरित्र (ले. डॉ. लवटे), वि.स. खांडेकर: एक ध्येयवादी शिक्षक (ले. जया दडकर) या पुस्तकांचेही प्रकाशन झाले. त्याचबरोबर साप्ताहिक साधना, दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका, जडण-घडण, मेहता ग्रंथजगत या नियतकालिकांच्या खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष विशेषांकांचेही प्रकाशन करण्यात आले.