कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने अटक केलेला दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्या न्यायालयीन कोठडीत आज वाढ करण्यात आली. मंगळवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरला होणार आहे.
पानसरे हत्येप्रकरणी एसआयटीने समीर विष्णू गायकवाड या संशयिताला अटक केल्यानंतर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे या दुसऱ्या संशयिताला अटक केली होती. डॉ. तावडे याला यापूर्वीच सीबीआयने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनप्रकरणी अटक केली होती. मंगळवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर झालेल्या सुनावणीतही डॉ. तावडे याला पुन्हा न्यायालयीन कोठडी वाढवून देण्यात आली. पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरला होणार आहे. सरकार पक्षातर्फे अॅड. चंद्रकांत बुधले यांनी काम पाहिले. दरम्यान, डॉ. तावडे यांच्या वकिलांमार्फत दाखल केलेल्या अवमान याचिकेवर १६ नोव्हेंबरच्या सुनावणीत निकाल होण्याची शक्यता आहे, तर संशयित समीर गायकवाड याच्यावरील आरोपनिश्चितीबाबत २५ नोव्हेंबरला जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.
