सांगली : जिल्ह्यातील जनतेने भाजपला पराभूत केले आहे, तरीही जिल्हा परिषदेत सत्तेत जाण्याची घाई कशासाठी असा सवाल खासदार विशाल पाटील यांनी उपस्थित करताच हिम्मत असेल तर काँग्रेसने ११ सदस्यांवर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करून दाखवावी असे प्रतिआव्हान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना खा. पाटील म्हणाले, महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला जनतेने नाकारले आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यात भाजपचा एकही सदस्य निवडून येउ शकला नाही. मिरज व जतमध्ये भाजपला यश मिळाले असले तरी या ठिकाणी आम्ही अगोदर लक्ष घातले असते तर या ठिकाणीही पराभव झाला असता. जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट कमी आहे. तरीही यांना सत्तेत घुसण्याची घाई का झाली आहे हे समजत नाही. आता त्यांनी पराभवाची सवय लावून घ्यायला हवी. भाजपने सत्तेचा दुरूपयोग करत अमाप पैसा खर्च करूनही लोकांनी नाकारले आहे. यापुढेही त्यांना जनता नाकारेल.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिलेल्या भाजप प्रवेशाबाबत विचारले असता खा. पाटील म्हणाले, विखे-पाटील व वसंतदादा घराण्याचे चार पिढ्यांचे संबंध आहेत. त्यांनी अपेक्षा व्यक्त केली असली तरी मी अपक्ष निवडून आलो असल्याने कायद्याने मी अपक्षच राहणार आहे.सध्या मी आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करत असून आमच्यात कोणतेही मतभेद उरलेले नाहीत. यामुळे मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रश्नच उरत नाही असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, या टीकेवर बोलताना पालकमंत्री म्हणाले, सगळ्या निवडणुका रांगेने झाल्या आता काय पराभव होणार आहे असा टोला लगावत काँग्रेसला जर ११ जिल्हा परिषद सदस्यांवर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष मिळाला तर मानावे लागेल. हिम्मत असेल तर त्यांनी जिल्हा परिषदेत काँग्रेसचा अध्यक्ष करून दाखवावा असे खुले आव्हान त्यांनी दिले. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार असेही त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.
