सांगली : विरोधकांच्या सूचनांना बेदखल करत गुरूवारी विटा नगरपालिकेचा १७४ कोटींचा अर्थसंकल्प अवघ्या १५ मिनीटात मंजूर करण्यात आला. नगराध्यक्ष काजल म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सत्ताधारी व विरोधक यांच्यात पहिल्याच सभेत खडाजंगी झाल्याचे दिसून आले.
विटा नगरपालिकेच्या २०२६ -२७ या आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यासाठी नगरपालिकेच्या हणमंतराव पाटील सभागृहात निर्वाचित सदस्यांची बैठक नगराध्यक्षा श्रीमती म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

येत्या वर्षात १७४ कोटी रूपये खर्चाच्या शिलकी अंदाजपत्रकास सभागृहाने मंजुरी दिली. शहरात नमो उद्यान उभारणी, भूयारी गटार योजना, नवीन पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेणे, सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे तसेच सौरऊर्जा प्रकल्प राबविणे आदी महत्वाकांक्षी कामांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात तब्बल ७७ कोटी रुपयांची वाढ झाल्याने हा आजवरचा सर्वाधिक निधीचा अर्थसंकल्प ठरला आहे. अर्थसंकल्प मंजुरीची सभा अवघ्या पंधरा मिनिटांत आटोपली; मात्र सुरुवातीलाच आसनव्यवस्थेवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी झाली.

माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक संजय भिंगारदेवे यांनी सर्वांचा सन्मान राखला जाईल, अशी आसन रचना निश्चित करावी, अशी मागणी मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्याकडे केली. त्यास विरोधी पक्षनेते अ‍ॅड. अजित गायकवाड यांनीही पाठिंबा देत, आम्ही संख्येने कमी असलो तरी गटनेते आहोत; आमचाही सन्मान राखावा, अशी भूमिका मांडली. यानंतर भिंगारदेवे यांनी स्थायी समितीने मान्यता दिलेला अर्थसंकल्प जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यास सभेची मंजुरी द्यावी, असा ठराव मांडला. बांधकाम सभापती श्रीकांत साळुंखे यांनी त्यास अनुमोदन दिले. मात्र विरोधी पक्षनेते गायकवाड बोलण्यासाठी उभे राहताच नगराध्यक्षा श्रीमती म्हेत्रे यांनी सभेचे कामकाज संपल्याची घोषणा केली. त्यामुळे संतप्त विरोधकांनी उपसूचना मांडू न देणे योग्य नसल्याचा आरोप केला. माजी नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांनीही विरोधकांना बोलू न देणे ही लोकशाही पद्धत नसल्याचा आरोप केला.

दरम्यान, सत्ताधारी गटाचे नेते तथा उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांनी शहरासाठी २.५ कोटी रुपयांचा सौरऊर्जा प्रकल्प, भूयारी गटार, पाणीपुरवठा, सीसीटीव्ही आणि विविध विकास योजनांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला. विरोधकांनी केवळ विरोधासाठी विरोध करू नये, जनतेने विकासासाठी कौल दिला आहे, असे सांगत त्यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले.