कोल्हापूर: हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे श्री विठ्ठल बिरदेव महाराजांच्या यात्रेला गुरुवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ढोल, कैताळ वाद्याचा गजर आणि विठ्ठल बिरदेवाच्या नावाने चांगभलच्या निनादाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. भंडाऱ्याच्या उधळणीत भाविक दंग झाले होते.

महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेशसह उत्तर प्रदेशातून लाखो भाविक दाखल झाले आहेत.यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या भाकणूककार फरांडे बाबांनी केलेल्या भविष्यवाणीने लक्ष वेधून घेतले आहे, अंजनगावचे मानकरी नानादेव वाघमोडे महाराज उर्फ फरांडे बाबा हे १७ दिवस पायी चालत पट्टणकोडोलीत दाखल झाले.  मानकऱ्यांनी त्यांना विठ्ठल बिरदेव मंदितत येण्याचे आमंत्रण दिले. प्रकाश पाटील आणि रणजित पाटील यांच्या हस्ते मानाच्या तलवारीचे पूजन करण्यात आले.

भंडाऱ्याची प्रचंड उधळण

यानंतर फरांडे बाबांनी पारंपरिक हेडाम नृत्य करत पोटावर तलवारीचे वार केले, यावेळी भंडाऱ्याची प्रचंड उधळण करण्यात आली. ढोल, कैताळ वाद्याचा गजर आणि विठ्ठल बिरदेवाच्या नावाने चांगभलच्या निनादाने संपूर्ण परिसर दणाणून गेला.

देशावर महिला राज्य करतील

यानंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेली भाकणूक पार पडली. भाकणुकीत फरांडे बाबा म्हणाले, देशावर महिला राज्य करतील. राजकारणात अनेक ठिकाणी गोंधळ माजून मोठी उलथापालथ होईल. सात दिवसात पाऊस पडेल.  अनेक ठिकाणी नवनवीन संशोधन होईल. त्याचा त्रास नागरिकांना होईल. मिरची आणि साखर महाग होईल. देश-विदेशात अनेक आंदोलने होऊन मोठ्या लढाया होतील, अशी भविष्यवाणी त्यांनी वर्तवली आहे.

परिसर गजबजला

भाकणुकीनंतर विठ्ठल बिरदेवाच्या दर्शनासाठी भक्तांची प्रचंड गर्दी झाली. यात्रेसाठी साधारणतः चार लाख भक्त पट्टणकोडोलीत दाखल झाले आहेत. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, देवस्थान कमिटी आणि पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

धनगर समाज श्रद्धास्थान

पट्टणकोडोलीची श्री विठ्ठल बिरदेव यात्रा ही महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण लोकयात्रा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात असलेल्या पट्टणकोडोली गावात दरवर्षी अश्विन महिन्यात ही यात्रा मोठ्या उत्साहात भरते. धनगर समाजासह लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे भंडाऱ्याची (हळदीची) प्रचंड प्रमाणात केली जाणारी उधळण. संपूर्ण मंदिर परिसर आणि पट्टणकोडोली गाव पिवळ्याधमक रंगाने न्हाऊन निघते, ज्यामुळे याला ‘सोन्याची नगरी’ असेही रूप प्राप्त होते.