कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत पुरोगामी विचारातून सुरू झालेला प्रचाराचा मुद्दा हिंदूत्वाच्या वळणावर येऊन ठेपला आहे. हिंदूत्ववादी विचारसरणीच्या मतदारांना आपल्याकडे खेचण्याच्या  अखेरच्या टप्प्यात महाविकास आघाडी आणि भाजप या दोन्हीकडून जोरदार प्रयत्न झाला आहे. हिंदूत्ववादी आकर्षण असलेले शिवसेनेचे मतदार पक्षाच्या आदेशानुसार आघाडीकडे राहणार की भाजपच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘कमळा’कडे झुकणार यावर निर्णयाचा कल अवलंबून आहे.

महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला त्यावरूनच संघर्ष दिसून येत होता. मतदारसंघात एकूण ५ वेळा आणि आपण स्वत: दोन वेळा निवडून आल्याचा दावा करीत माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी उमेदवारी मिळाली पाहिजे यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न चालवले होते. मात्र विकास आघाडीच्या सूत्रानुसार ही जागा काँग्रेसकडे गेली. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली असताना यापूर्वी या मतदारसंघात काँग्रेसकडून निवडणुकीत उतरलेले आणि आता भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांना भाजपने उमेदवारी दिली. गेले १५ दिवस मविआ आणि भाजपच्या राज्यभरातील प्रमुख नेत्यांच्या तोफा धडाडत राहिल्या.

हिंदूत्व  प्रभावी ?

विकासकामे, मतदारसंघाचे प्रश्न आदी मुद्दे प्रचारात मागे राहिले. आरोप-प्रत्यारोप यांच्या फैरीमुळे कोणाची बाजू खरी याचा गोंधळ मतदारात निर्माण झाला आहे.  मतदारांना आकर्षित करण्याचे सर्व मार्ग चोखाळले गेल्याने अर्थगंगा वाहत राहिली. परिणामी दोन्ही प्रमुख उमेदवारांत कोण बाजी मारणार याची एकच उत्कंठा जिल्ह्याला लागून राहिली आहे. अखेरच्या टप्प्यात प्रचाराचे वळण हिंदूत्वाच्या मुद्दावर केंद्रित झाले. भाजपे हा मुद्दा हळूहळू तापवत ठेवला तर ‘मविआ’लासुद्धा त्याचा पिच्छा करणे भाग पडले. 

शिवसेनेकडे लक्ष

महाविकास आघाडीच्या सत्ता सूत्रानुसार कोल्हापुरात काँग्रेसला उमेदवारी मिळणार हे पंढरपूर, देगलूर या पोटनिवडणुकीतील उमेदवारी वाटप सूत्रानुसार निश्चित झाले होते. तरीही राजेश क्षीरसागर आपला उमेदवारीचा दावा कायम ठेवत होते. याचवेळी त्यांनी ‘ शिवसेनेची मते काँग्रेसला जात नाहीत’ असा मुद्दा मांडून एक संदेश दिला होता. जाधव यांना उमेदवारी दिल्यानंतर क्षीरसागर हे कार्यकर्त्यांसह प्रचारात सक्रिय झाले. याउपरही शिवसेनेची मते कोणाच्या पारडय़ात झुकणार याचीच चर्चा मतदानाची वेळ आली तरी रंगली आहे. यातून अस्वस्थता अंतर्गतरीत्या जाणवत आहे. भाजपचे राज्यातील तमाम नेते प्रचारात ताकदीने उतरले असताना ‘मविआ’तील काहींचा संथपणा चर्चेचा विषय ठरला.

आजी- माजी मुख्यमंत्र्यांत सामना

शिवसेनेतील अस्वस्थता लक्षात घेऊन भाजपने त्यांना हिंदूत्वाची साद घातली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील  शिवसैनिकांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. कोल्हापुरात आल्यावर शाल पांघरलेले बाळासाहेब ठाकरे यांचे फलक दिसायचे. आता त्यांच्या प्रतिमेसोबत सोनिया गांधी दिसत आहेत, असे म्हणत त्यांनी एका अर्थाने शिवसैनिकांच्या अंगभूत हिंदूत्वाच्या भावनेला फुंकर घातली आहे. फडणवीस यांच्या प्रखर हिंदूत्वाच्या मांडणीची दखल महाविकास आघाडीला  घ्यावी लागली. आणि प्रचार संपण्यास काही तासांचा अवधी उरला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऑनलाइन का असेना सभा घ्यावी लागली. ‘हिंदूत्व म्हणजे भाजप नव्हे; तर हिंदूत्वाचे खरे रक्षणकर्ते शिवसेना आहे अशी मांडणी ठाकरे यांनी केली.  काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी राहण्याचे आवाहन करताना त्यांनी शिवसैनिकांना कोणत्याही आमिष आणि वैचारिक गोंधळाला बळी पडू नका, असे आवाहन करावे लागले. असे करूनही ३० हजाराच्या आसपास मतांचा गठ्ठा असणारे सैनिक कोणत्या बाजूला झुकणार यावर सारे फलित अवलंबून आहे.