सातारा : वाई औद्योगिक वसाहतीमधील एका प्रसिद्ध गणेशमूर्ती कारखान्याला मंगळवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत मोठे नुकसान झाले आहे. येथील ‘बावळेकर गौरी-गणपती मूर्ती कारखान्या’मध्ये रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास अचानक आग भडकली.आगीची माहिती मिळताच वाई नगरपालिकेसह गरवारे वॉलरॉक्स, पाचगणी, महाबळेश्वर, फलटण सातारा पालिका आणि किसन वीर साखर कारखान्याचे अग्निशामक बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुमारे ४ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पहाटेच्या सुमारास आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले.

​केमिकल आणि रंगाच्या डब्यांमुळे आग भडकली

कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पेंटिंगचे रंगाचे डबे, थिनर आणि इतर रसायने (केमिकल) साठवलेली होती. या ज्वलनशील पदार्थांमुळे आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. आग विझवताना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना मोठा संघर्ष करावा लागला. मध्यरात्री लागलेल्या या आगीमुळे परिसरात मोठा धूर पसरला होता.

​पोलीस आणि स्थानिक कार्यकर्त्यांची धाव

घटनेची माहिती मिळताच स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी मदतीसाठी मोठी गर्दी केली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून वाईचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे यांच्यासह मोठा पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवत मदतकार्याला गती दिली.

​गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे बावळेकर कारखान्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून अनेक तयार मूर्ती जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.