सातारा: अनेक ऋषीमुनींची तपोभूमी, ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या पावन ‘दक्षिण काशी’ अर्थात वाई शहराचे माहात्म्य संपूर्ण जगभर पोहोचावे, या उदात्त हेतूने वाईत प्रथमच ‘लघु कुंभमेळा २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. वाई नगर परिषद आणि ‘लघु कुंभ सेवा समिती, शक्ती शिवगंगा अटल आश्रम’ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारपासून दि. २१ ते २५ मेपर्यंत कृष्णाकाठच्या महागणपती घाट येथे हा ऐतिहासिक सोहळा होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष अनिल सावंत, मदन गोसावी महाराज, तसेच मुख्य आयोजकांनी पत्रकारांना दिली.
अनिल सावंत यांनी सांगितले, की हरिद्वार, उज्जैन, प्रयागराज आणि त्र्यंबकेश्वर या मुख्य कुंभमेळ्यांइतकेच वाईचे धार्मिक महत्त्व आहे. हा केवळ धार्मिक उत्सव नसून, तरुण पिढीला भारतीय संस्कृती, परंपरा आणि साधू-संतांच्या विचारांची ओळख करून देण्यासाठी उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
पाच दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. २१ रोजी गुरुपुष्यामृत योगानिमित्त छावणी भूमिपूजन व छावणी प्रवेश (सकाळी ११ वा.), शुक्रवारी (दि. २२) धर्मध्वजा आरोहण (सकाळी ११ वा.), शनिवार दि. २३ रोजी श्री विष्णुयाग व सार्वजनिक हवन, रविवार दि. २४ रोजी हिंदू महासभा व भव्य दीपप्रज्वलन (दुपारी ४ वा.) आणि सोमवार, दि. २५ रोजी नागा संन्याशांचे पावन स्नान, मान्यवर साधू-संत, आचार्य, महामंडलेश्वर व श्रीमहंत यांच्या भव्य रथ शोभायात्रेसह महिला कलश शोभायात्रा पार पडणार आहे. तसेच दररोज सायंकाळी साडेसहा वाजता ‘श्री कृष्णामाई आरती’ आयोजित करण्यात आली आहे.
या लघु कुंभमेळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे देशभरातून येणारे विविध तपस्वी साधू-संत असणार आहेत. यामध्ये अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्र पुरीजी महाराज, गिरनारचे पीठाधीश्वर, तसेच राजस्थान आणि दिल्ली येथील शनी देवस्थानाचे पीठाधीश्वर उपस्थित राहणार आहेत. विविध विद्यांचे जाणकार, विद्वान, हठयोगी, खडेश्वरी, ऊर्ध्वबाहू आणि नागा संन्याशांची उपस्थिती या सोहळ्याची शोभा वाढवणार आहेत. राज्यातील अनेक मंत्री, खासदार, आमदार, तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवर नेतेही या सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
लाखो भाविकांच्या उपस्थितीचा विचार करून समितीने प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या सहकार्याने चोख व्यवस्था केली आहे.
संपूर्ण परिसरावर २४ तास सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवली जाणार असून, स्वतंत्र प्रवेश व निर्गमन मार्ग, लाइव्ह अनाउन्समेंट सिस्टीम, तसेच आपत्कालीन मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. साधू-संतांसाठी निवास व महाप्रसादाची विशेष सोय करण्यात आली असून, रुग्णवाहिका, अग्निशामक दल आणि वैद्यकीय मदत केंद्रही सज्ज ठेवण्यात आले आहे. जे भाविक प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार नाहीत, त्यांच्यासाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि यू ट्यूबद्वारे सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
