सातारा : ‘दक्षिण काशी’म्हणून ओळख असलेल्या वाईमध्ये लघु कुंभमेळ्यास प्रारंभ झाला असून, महागणपतीच्या कृष्णामाई घाटावर महाआरती झाली. यावेळी राज्य तसेच परराज्यातून आलेल्या साधुसंतांसह वाईकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्यामुळे अवघा महागणपती घाट भक्तीरसात चिंब झाला होता.
‘दक्षिण काशी’ अशी अध्यात्मिक ओळख असलेल्या आणि कृष्णा नदीच्या विस्तीर्ण तीरावर वसलेल्या ऐतिहासिक वाई नगरीत लघु कुंभमेळ्याचा शुभारंभ अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात झाला आहे. पवित्र अशा वाईच्या भूमीत आयोजित करण्यात आलेल्या लघु कुंभमेळ्यामुळे जत्रेचे स्वरूप आले आहे. सायंकाळी महागणपती घाटावर कृष्णा नदीच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे असंख्य साधुसंतांसह वाईकर नागरिकांची एकच गर्दी घाटावर झाली होती.
नगराध्यक्ष अनिल सावंत व आयोजकांच्या हस्ते कृष्णेची आराधना करण्यात आली. महाआरती सुरू असताना मंत्रोच्चार आणि शंखनादाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. नदीचे दोन्ही काठ भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. दिव्यांच्या प्रकाशाने आणि भक्तीच्या चैतन्याने कृष्णाकाठ उजळून निघाला होता. पावित्र्य कृष्णामाई महाआरतीचे दृश्य अतिशय विलोभनीय वाटत होते. कुंभमेळ्यासाठी देशभरातून आलेल्या उपस्थित महंत, साधू संत आणि नागा संन्यासी यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली. अनेकांनी मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद घेतले.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेऊन, लघु कुंभमेळा सेवा समिती आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने अत्यंत चोख नियोजन व कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता हा सोहळा अत्यंत शिस्तीत आणि उत्साहात पार पडला.
