सांगली : विठ्ठल भेटीसाठी पायी निघालेल्या वारकर्यांची वारी मार्गावर सेवा सुरू असतानाच मुक्कामाच्या ठिकाणी वारकर्यांच्या साहित्याची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे.या चोरी प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
आषाढी एकादशीनिमित्त कर्नाटक, गोवा या राज्यातील वारकरी मिरज मार्गे पंढरपूरला रवाना होतात. गेल्या तीन दिवसापासून दिंडीमार्गावर या वारकर्यांचे पाय चेपण्यापासून त्यांच्या आरोग्याची वारी मार्गावर तपासणी करण्याची मोहिम राबवली जात आहे. तसेच मिरजेतील काही मंडळाकडून वारकर्यांना भोजन देण्याबरोबआ अल्पोपहार, फराळ, आणि शुध्द पाण्याचे वितरण केले जात आहे.
या निमित्ताने सावळ्या विठ्ठलाची सेवा केल्याचे समाधान मिळत असल्याचे मंडळातील कार्यकर्ते सांगतात. पद्मावती फौडेशनच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पैजारवाडीच्या दिंडीतील वारकर्यांना भोजन व्यवस्था करण्यात आली होती, तर जनसुराज्य शक्ती पक्षाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी आषाढी वारी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक लाख राजगिरा लाडू व एक लाख शुध्द पाण्याच्या बाटल्या वितरीत केल्या.
कर्नाटक व गोवा राज्यातील काही गावातून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला दिंड्या काढण्यात येतात. या दिंड्या महामार्गालगत असलेल्या शेडमध्ये अथवा एखाद्या शाळेत रात्रीचा मुक्काम करतात. गोव्यातील पिर्ण येथील श्री संत ज्ञानेश्वर, तुकाराम वारकरी मंडळाची दिंडी मालगाव (ता. मिरज) गावच्या हद्दीत विठुमाउली पार्कच्या पत्र्याच्या शेडमध्ये मुक्कामास असताना वारकर्यांच्या पिशवीतील १६ हजाराचे चार मोबाईल आणि १ लाख २७ हजार ५०० रूपयांची रोकड लंपास झाली आहे.
तृप्ती तुलसीदास माऊलीकर, अंजली अनिल साळगावकर, शलाका पेर्णेकर, योगिता सावळे, रीमा पेडणेकर,प्रदीप फडके, सर्वेश कळंगुटकर, सागर हळणकर, महादेव कांदोलकर या वारकर्यांचे पैसे व मोबाईल चोरट्यानी लंपास केले आहे. याबाबत चंद्रकांत गवंडी (रा.बार्देश गोवा) यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
