कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या ८१ जागांसाठी तर इचलकरंजी महापालिकेच्या ६५ जागांसाठीचे प्रभागनिहाय आरक्षण मंगळवारी जाहीर करण्यात आले. ते पाहण्यासाठी इच्छुकांची गर्दी उसळली होती. अपेक्षित आरक्षण न पडल्याने अनेकांच्या अपेक्षांवर पाणी फिरल्याने त्यांचे चेहरे हिरमुसले होते.या आरक्षण सोडतीनंतर कोल्हापूर, इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीचा औपचारिक पाया रचला गेला असून, येत्या काही दिवसांत राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होतील.कोल्हापुरात ८१ जागांसाठी २० प्रभागात ही सोडत पार पडली. यात सर्वसाधारण ४९ (महिला २४), अनुसूचित जाती ११ (महिला ६) आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग २१ (महिला ११) असा आरक्षणाचा तपशील निश्चित करण्यात आला आहे.
महापालिकेच्या निवडणुकीकडे कोल्हापूरकरांचे लक्ष लागलेले असतानाच आजच्या सोडतीमुळे इच्छुक उमेदवारांमध्ये उत्सुकतेचा शिखरबिंदू गाठला. आपल्या प्रभागात कोणते आरक्षण लागू होणार याची उत्कंठा असल्याने सकाळपासूनच महापालिका सभागृहात प्रचंड गर्दी झाली होती. अनेकांनी आपल्या समर्थकांसह उपस्थित राहून थेट निकाल पाहिला.या सोडतीदरम्यान पारदर्शकता राखण्यासाठी स्थानिक वाहिन्यांवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. तसेच, सभागृहाबाहेर आणि परिसरात मोठ्या पडद्याची व्यवस्था करून नागरिकांना सोडतीचा थेट अनुभव घेता आला. आयुक्त के. मंजू लक्ष्मी व अन्य अधिकाऱ्यांनी सोडत प्रक्रिया पार पाडली.
इचलकरंजीत उत्सुकता ताणली
इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या वहिल्या सार्वत्रिक निवडणूकसाठी प्रभागनिहाय आरक्षण प्रक्रिया निश्चित करण्यात आली. आयुक्त पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आरक्षण सोडतीत ६ जागा अनुसुचित जातीसाठी, १७ जागा नागरिकांचा मागास वर्ग आणि ४२ खुल्या जागा निश्चित करण्यात आल्या. प्रत्येक आरक्षणाच्या चिठ्ठ्या करून कुणाल कुंभार, सई खोंद्रे, कार्तिक राठोड, उत्कर्षा सावंत शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आल्या. त्यानंतर सर्वच प्रभागातील ५० टक्के आरक्षणानुसार प्रत्येक प्रभागात दोन जागा यानुसार महिलांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. तर उर्वरीत जागा या सर्वसाधारण यासाठी असल्याचे जाहीर करण्यात आले. एकूणच सोडतीची रचना पाहता प्रभागातून उमेदवारी देताना सर्वच पक्षातील नेतेमंडळींची मोठी कसरत होणार आहे.
निवडणूक प्रक्रियेला गती
सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षण निश्चित झाल्याने आता राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रभागात प्रचार यंत्रणा सक्रिय करण्यास सुरुवात केली आहे. काही प्रभागांमध्ये आरक्षण बदलल्याने काही संभाव्य उमेदवारांचे गणित बिघडले असून, नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
