सातारा: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेश करत आहे. मोठ्या संख्येने वारकऱ्यांची निरा नदी ओलांडून साताऱ्याच्या हद्दीत पाडेगाव (ता खंडाळा) ला येण्यासाठी सकाळपासून निरा पुलावर एकच गर्दी झाली होती. यावेळी एक वारकरी नीरा नदीच्या पुलावरून खाली पडला.
वारकऱ्याला राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी अत्यंत तत्परतेने सुरक्षित बाहेर काढले. एनडीआरएफच्या वेळेत मिळालेल्या मदतीमुळे या भाविकाचे प्राण वाचले असून, वारी सोहळ्यातील एक मोठी दुर्घटना टळली आहे.आज बुधवारी सकाळी ही घटना घडली.
गणेश शंकर बिषे (वय४२) असे वाचलेल्या वारकऱ्याचे नाव आहे. आज सकाळी आषाढी वारी पालखी सोहळा नीरा नदी परिसरातून मार्गस्थ होत असताना ही घटना घडली. वारकऱ्यांची मोठी गर्दी असताना गणेश बिषे यांचा पाय घसरला आणि ते थेट पुलावरून खाली नीरा नदीच्या पात्रात पडले. उंचीवरून पडल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली होती आणि ते पाण्यात बुडत होते.
पालखी सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी आणि सुरक्षेसाठी नीरा नदीवर एनडीआरएफ’च्या बटालियनची पथक तैनात आहे. निरीक्षक दिलीप कुमार यांच्या नेतृत्वाखाली ही टीम तेथे सुरक्षेची जबाबदारी सांभाळत होती. भाविक नदीत पडल्याचे समजताच एनडीआरएफच्या जवानांनी कसलाही विलंब न लावता तातडीने नदीच्या पात्रात धाव घेतली.
जवानांनी अत्यंत कौशल्याने आणि वेगाने बचाव मोहीम राबवून जखमी गणेश बिषे यांना पाण्याच्या प्रवाहातून सुखरूप बाहेर काढले. नदीबाहेर काढल्यानंतर एनडीआरएफच्या पथकाने बिषे यांना प्रथमोपचार दिले. त्यानंतर पुढील तातडीच्या उपचारांसाठी त्यांना प्रशासनाच्या वैद्यकीय पथकाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या जवानांनी दाखवलेल्या या धाडसाचे आणि तत्परतेचे पालखी सोहळ्यातील वारकरी आणि स्थानिक प्रशासनाकडून कौतुक केले जात आहे.
