कोल्हापूर : वारणानगर येथील दुग्ध व्यवसाय क्षेत्रात वारणा ब्रॅन्डचा जागतिक पातळीवर नावलौकीक वाढला आहे. संघास दूध पुरवठा करणाऱ्या  उत्पादकांसाठी दूध क्रांतीचा नवा अध्याय म्हणून संघाच्या १ लाख १७ हजार दूध उत्पादकांना एकत्रित कुटुंबाप्रमाणे ५० रुपयांच्या किमतीत ‘वारणा अमृत बंध योजने’तून वर्षातून तीन वेळा दोन किलो श्रीखंड भेट देणार असल्याची सहकातील पहिली क्रांतीकारी घोषणा वारणा समुहाचे प्रमुख आमदार विनय कोरे यांनी सभेत केली.वारणा दूध संघाची सुमारे १५४२ कोटींची उलाढाल झाली असून ८० कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. प्रतिदिन दहा टन उत्पादीत होणारा पनीर निर्मितीचा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार असल्याचे कोरे यांनी जाहीर केले.

वारणा सहकारी दूध संघाच्या ५८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कोरे बोलत होते. कोरे म्हणाले,सहकाराचे दीपस्तंभ असणाऱ्या वारणा च्या आदर्श योजना देशाच्या सहकारात सुरू करण्याचा मानस केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा आहे तसेच वारणेच्या यशस्वी विमा मॉडेलची दखल केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाने घेतली आहे वारणाची सर्व दुग्ध उत्पादने विविध कंपन्यांच्या मार्फत ऑनलाईन घरपोच पोहचण्याची सुविधा सुरू केली जाणार आहे.

दही,आईस्क्रीम,फ्लेवर मिल्क,टेबल बटर,जलशुद्धीकरण हे प्रकल्प नव्याने सुरू करून गुणवत्तेच्या जोरावर वारणाच्या उत्पादनांना बाजारपेठेत मोठी मागणी वाढली आहे आर्थिक वर्षात संघाची २७१ कोटींची उलाढाल वाढली असून ती १५४२ कोटींपर्यंत उलाढाल झाली आहे.मुंबईसह राज्यात व राज्याबाहेर वारणाच्या उत्पादनांना ग्राहकांची मोठी पसंती मिळाली असून वारणेत प्रतिदिन १० टन पनीरचा नवा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे कोरे यांनी सांगून सर्वाधिक चढ्या दराने विक्री होणाऱ्या हैदराबाद शहरात दूध व दुग्ध उत्पादने पुरविण्याचा शुभारंभ केला असून शहरासाठी लवकरच मोठा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे.

वारणा दूध संघ व तात्यासाहेब कोरे व्हेर्टनरी काॅलेजच्या माध्यमातून जनावरांचे आजार व उपचारावर संशोधन करणारा देशातील वारणा एकमेव असणार  आहे संघाचे नक्त मूल्य १५०० कोटींच्या पुढे गेले असून सभासदांच्या ५ हजार किमतीच्या शेअर्सचे मूल्य सात लाख रुपये झाली आहे.वारणा दूध संघाचे अध्यक्ष एच.आर.जाधव यांनी स्वागत केले उपाध्यक्ष ॲड.एन.आर. पाटील यांनी श्रध्दांजलीचा ठराव मांडला.संचालक अभिजित पाटील यांनी डॉ.कोरे यांना सहकारभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला.संघाचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी विषयवाचन केले.व्यासपीठावर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील,वारणा बॅंकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, लेखापरीक्षक रणजीत शिंदे, जीसएसटी सल्लागार अमर पाटील,संघाचे सर्व संचालक, पदाधिकारी,सभासद उपस्थित होते.संचालक शिवाजीराव कापरे यांनी आभार मानले. शितल बसरे यांनी सूत्रसंचालन केले.

४०७ कोटींची ऑर्डर

शासनाच्या आदिवासी विभागाला सुगंधी दुध पुरवठा करण्याची २९० कोटींची ऑर्डर, समाजकल्याण विभागातील आश्रम शाळांना पुरवठा करणेसाठी ९० कोटी,भारतीय नेव्ही ला दुधासाठी १२ कोटींची आणि मुंबईच्या सिध्दीविनायक ट्रस्टला तुपासाठी १५ कोटींची ऑर्डर मिळाली असून सुमारे ४०७ कोटींची मागणी संघाकडे आली आहे.