शासनाने शहरातील टोलमुक्तीचा अध्यादेश तत्काळ प्रसिद्ध करावा, आयआरबी कंपनीला कोल्हापुरातून विनाविलंब हद्दपार करावे, या मागणीसाठी टोलविरोधी कृती समितीच्या वतीने सोमवारी येथील शिरोली टोल नाक्याजवळ ठिय्या आंदोलन करण्यात आले. कोल्हापूरची जनता टोलमुक्तीसाठी टाहो फोडत असतानाही बहिऱ्या सरकारला त्यांचा आवाज ऐकू जात नाही. यापूर्वीच्या सरकारने टोलमुक्तीचा शब्द देऊन पाळला नाही, त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागले. आताच्या सरकारनेही टोलमुक्तीचा शब्द दिला आहे, तो त्यांनी पाळावा, अन्यथा त्यांनाही परिणाम भोगावे लागतील, असा इशारा ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी या वेळी दिला.
टोलविरोधी कृती समितीच्या वतीने टोलविरोधी आंदोलनाला महापालिका निवडणुकीनंतर पुन्हा हात घातला आहे. याअंतर्गत शेकडो कार्यकर्त्यांनी शिरोली टोल नाक्यावर धरणे आंदोलनात भाग घेतला. या वेळी कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. ‘देणार नाही देणार नाही, टोल आम्ही देणार नाही, ‘आयआरबीचा बोका त्याला दिसेल तेथे टोका’, ‘चले जाव चले जाव, आयआरबी चले जाव’ आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या.
सध्या टोलमुक्तीचे प्रकरण रस्ते मूल्यांकन आणि आयआरबीला देण्यात येणाऱ्या रकमेवर तटले आहे. टोल ज्यांनी आणला त्यांनीच तो परत घालवण्याची जबाबदारी घ्यावी, असे सरकारला असे स्पष्टपणे सांगत प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, राज्य सरकार व महापालिका यांनी आयआरबी कंपनीला द्यावयाच्या रकमेचा निर्णय घ्यावा. मात्र त्याचा भार जनतेवर पडणार नाही याची दक्षता घ्यावी. तसे झाले तर ते आम्ही खपवून घेणार नाही.
कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे म्हणाले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी १ डिसेंबरला टोलमुक्त कोल्हापूर करण्याची घोषणा केली आहे. तसे झाले तर त्यांचे स्वागत आहे. मात्र आमचा तोंडी बोलण्यावर विश्वास नाही. शासनाने टोलमुक्तीची प्रत्यक्ष कृती करावी, अन्यथा जनता उग्र आंदोलन करेल.
या वेळी वसंत मुळीक, बाबा पार्टे, लाला गायकवाड, दीपा पाटील, दिलीप पवार, दिलीप देसाई, बाबा इंदुलकर, सुभाष जाधव, भगवान काटे, मेघा पानसरे, वैशाली महाडिक, वेंक्काप्पा भोसले, सुरेश जरग, प्रसाद पाटील, रमेश मोरे, अवधूत पाटील आदींसह कृती समितीचे कार्यकत्रे उपस्थित होते.