पाणलोट क्षेत्रात पावसाचा जम बसल्याने गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड येथे पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. कोल्हापूर शहरात दिवसभर  पावसाची रिपरिप सुरू झाल्याने रविवारची सुट्टी घरातच घालवावी लागली. तर अनेकांनी वर्षांसहलीला प्राधान्य दिले. पंचगंगेची पातळी १७ फुटांच्या वर गेल्याने नदीवरील राजाराम बंधारा यंदा पहिल्यांदाच पाण्याखाली गेला आहे.

गेले काही दिवस सायंकाळी पाऊस पडत असे, पण रविवारची सुरुवातच पावसाने झाली. दुपापर्यंत पावसाची उघडझाप सुरू राहिली. यामुळे रविवारच्या सुट्टीच्या नियोजनावर पाणी फिरले. जिल्हय़ाच्या पश्चिमेकडील भागात जोरदार पाऊस असल्याने डोंगरकपारीत भिजण्याचा आनंद घेण्यासाठी अनेकांनी या भागात जाण्यास प्राधान्य दिले. सध्या बंधाऱ्याचे सर्वच बरगे काढण्यात आल्यामुळे नदीपात्राच्या खालील बाजूस मोठय़ा प्रमाणात बंधाऱ्यातून पाणी जात आहे. येथे पुराचे पाणी पाहण्यासाठी गर्दी होत राहिली. सेल्फी काढत पहिल्या पुराच्या स्मृती जतन केल्या.  पाणलोट भागात वरुणराजा जोर पकडत असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. हातकणंगले, शिरोळ वगळता उर्वरित तालुक्यांत दमदार पाऊस होत आहे.

राधानगरी धरणात १.९४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. येथे जलसंचय वाढत चालला आहे. कोल्हापूर जिल्हय़ात आज सकाळी ७ वाजताच्या नोंदीनुसार धरण प्रकल्पातील पाणीसाठय़ाची माहिती पुढीलप्रमाणे आहे. धरणांचे नाव, आजचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये) आणि धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता (टीएमसीमध्ये) कंसामध्ये दर्शविण्यात आला आहे.

राधानगरी – १.९४ (८.३६ टीएमसी), तुळशी ०.८६ (३.४७ टीएमसी), वारणा ८.६४ (३४.३९ टीएमसी), दूधगंगा २.०४ (२५.३९ टीएमसी), कासारी ०.५८ (२.७७ टीएमसी), कडवी १.१८ (२.५१ टीएमसी), कुंभी १.१२ (२.७१ टीएमसी), पाटगाव ०.८५ टीएमसी (3.७१ टीएमसी), चिकोत्रा ०.१५ (१.५२ टीएमसी), चित्री ०.२५ (१.८८ टीएमसी), जंगमहट्टी ०.१३ (१.२२ टीएमसी), घटप्रभा १.५४ (१.५४ टीएमसी), जांबरे ०.१३ (०.८२ टीएमसी) आणि कोदे ल. पा. ०.११ (०.२१ टीएमसी) इतकी आहे.