इचलकरंजी शहराला सलग तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा न झाल्याने ३ लाख लोकसंख्येच्या या शहरात पाणीबाणी निर्माण झाली असताना मंगळवारी म्हैसाळ बंधा-यातून १२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, गत आठ दिवसांपासून बंद असलेला मजरेवाडी येथील एक उपसा पंप रात्री सुरू होत असल्याचा दिलासा देणारी माहिती मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यामुळे बुधवारी रात्री काही भागात पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शहरवासीयांना समाधान मिळणार आहे, मात्र एकंदरीत सर्व प्रक्रिया पाहता शहराला आणखी काही दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याची शक्यता आहे.
इचलकरंजी शहराला कृष्णा आणि पंचगंगा या दोन नद्यांतून पाणीपुरवठा होतो. मात्र पंचगंगा प्रदूषित झाल्याने येथील उपसा बंद ठेवण्यात आला आहे. तर कृष्णा नदीतील पाण्याची पातळी खालावल्याने गत चार दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत असून रास्ता रोको, आंदोलने, मोर्चा काढून नागरिक प्रशासनाला धारेवर धरत आहेत.
या संदर्भात कोल्हापूर व सांगली जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सांगली पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून त्याची माहिती दिली. या प्रमुख अधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत म्हैसाळ बंधाऱ्यातून १२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे रात्रीपर्यंत मजरेवाडी येथील उघडय़ा पडलेल्या इंटकवेलजवळ आवश्यक पाण्याची पातळी झाली. त्यामुळे रात्री उशिरा एका पंपाद्वारे पाणी उपसा सुरू होईल. त्याचबरोबर राजापूर बंधाऱ्याला लागलेल्या गळतीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी गळती काढण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिले आहेत.