येथील मध्यवर्ती कळंबा कारागृहामध्ये कैद्यांकडून मद्यसेवन, गांजा ओढणे, मांसाहारी भोजन आदी स्वरूपाच्या पार्टीचे प्रकार होत असलेला प्रकार एका व्हिडीओद्वारे उघड झाल्याने सोमवारी शहरात खळबळ उडाली. यामुळे तुरूंग अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून तुरूंग विभागाच्या पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तर स्थानीय अधिकारी या प्रकारावर कानावर हात ठेवून आहेत.
कोल्हापूर कळंबा मध्यवर्ती कार्यालयातील कारभार अनेकदा चच्रेत असतो. कैद्यांकडून आगळीक होत असल्याचा प्रकार वारंवार घडत असतो. या तुरूंगामध्ये ४३ महिलांसह १५९३ कैदी आहेत. या तुरूंगातील भोजन गृहामध्ये सुमारे ५ कैदी पार्टी करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये कैदी चक्क मद्य पार्टी, गांजा सेवन आणि मांसाहारावर ताव मारताना दिसत आहेत. विशेष म्हणजे तुरूंगाच्या कडेकोट बंदोबस्तातून या व्हिडीओचे चित्रण झाले कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तुरूंगातील कर्मचाऱ्यांना मोबाईल आतमध्ये नेण्यास परवानगी नाही त्यामुळे या प्रकाराचे गांभीर्य वाढले आहे.