सातारा : महाबळेश्वर वन विभागाने वेण्णा लेक परिसरात शुक्रवारी व्हेल माशाची उलटी (अंबर ग्रीस) जप्त केली आहे. पाच किलो वजनाच्या उलटीची तस्करी होत होती तिची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत काही कोटींच्या घरात आहे. याप्रकरणी वन विभागाने मुंबई, ठाणे, पुणे आणि मालवण येथील सात तस्करांना ताब्यात घेतले आहे. हितेंद्र मनोहर शेट्ये (लालबाग-परळ, मुंबई), अतुल अशोक विश्वासराव, मोहन हरिभाऊ पाटील (ठाणे), आकाश शामसुंदर धुरी (मालवण, सिंधुदुर्ग), एक्झम क्लेमेंट फर्नांडिस, विल्सन झुजे फर्नांडिस (मालवण, सिंधुदुर्ग) आणि कौस्तुभ मिलिंद प्रभू (धनकवडी, पुणे) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमच्या विविध कलमान्वये वन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या कारवाईने महाबळेश्वरात मोठी खळबळ उडाली आहे. व्हेल माशाची उलटीची तस्करी करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. व्हेल माशाच्या उलटीपासून सुगंधी अत्तर आणि औषधे बनवले जातात. तसेच व्हेल माशाच्या उलटीला समुद्रातलं तरंगणारं सोनं देखील म्हटलं जातं. पण यामुळे अनेकांकडून या व्हेल माशाच्या उलटीची तस्करी केली जाते. या तस्करीविरुद्ध वन विभागाकडून वेळोवेळी कारवाई केली जाते. आजची कारवाई यातूनच केलेली आहे.
महाबळेश्वर परिसरात व्हेल माशाच्या उलटीची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती साताऱ्याच्या सहाय्यक वन संरक्षकांना मिळाली होती. त्यानुसार वन विभागाच्या वेगवेगळ्या पथकांनी वेण्णा लेक आणि मेटतळे परिसरात सापळा रचून अनेक वाहनांची तपासणी केली. या तपासणीत एका वाहनामध्ये व्हेल माशाची उलटी आढळून आली. त्याचे वजन पाच किलो ३०० ग्रॅम असल्याचे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
अंबर ग्रीस हा वन्यजीव संरक्षण अधिनियमच्या अनुसूची एकमध्ये समाविष्ट असून त्याची विक्री, अवैध वाहतूक करणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यासाठी सात वर्षांची शिक्षा आणि पाच लाख रुपये दंडाची तरतूद आहे. व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीत आणखी कोणाचा सहभाग आहे काय, याचा तपास महाबळेश्वरचे वन परिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते करत आहेत. महाबळेश्वरचे वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश महांगडे, सुनील लांडगे, वनपाल तुकाराम निकम, बाबू मराठे, देवेंद्र पवार, अविनाश गवळी यांनी ही कारवाई केली.
